सध्याचे जग, जो दिखता है वो बिकता है.. याचे आहे आणि यामध्ये महत्त्वाची ठरते ती फूड फोटोग्राफी. चिकन दो प्याजा आहे तर.. कांदा आणि चिकन हे दोन्ही मुख्य पदार्थ एकमेकांच्या संगतीने फोटोत आले पाहिजेत. लालभडक रश्शामधील पारदर्शक कांदा प्रत्यक्ष खाताना कसा लागेल याची उत्सुकता बघणाऱ्याला वाटलीच पाहिजे. त्यासाठी जगभर  असंख्य प्रयोग केले जात आहेत. आपल्याकडे बटाटय़ाच्या भाजीवर कोथिंबीर किंवा पराठय़ावर लोणी असो वा पाश्चिमात्य देशामधील केकचे आयसिंग असो, पदार्थाचे देखणेपण अत्यंत कळीचे ठरत आलेले आहे आणि त्यामुळे फूड फोटोग्राफीला अनन्यसाधारण महत्त्व आलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्लासात ओतले जाणारे फेनधवल शुभ्र दाट दूध, खरपूस भाजलेल्या तांबूस तपकिरी टोस्टचा कुरकुरीतपणा नजरेला जाणवणारा.. लुसलुशीत मसालेदार कबाब.. गुप्प फुगलेल्या टमटमीत पुऱ्या, वाफाळणारा, घमघमणारा रस्सा, लालचुटूक रसाळ स्ट्रॉबेरी, रसरशीत तजेलदार फळे, तकाकणारी आणि वाफा टाकणारी तंदुरी, पिस्त्याच्या पखरणीने नटलेली रबडी, स्वच्छ पारदर्शक बर्फावर अलगद पडणारे सोनेरी पेय, पांढरे शुभ्र सॅडवीच, खुसखुशीत मसालेदार समोसे, मोठाल्या वाडग्यात टपटपत पडणाऱ्या लाह्य़ा आणि त्यावरचा सोनेरी मध.. आपण असे नेहमी आजूबाजूला पाहात आणि अनुभवत असतो.. कधी रेस्टॉरंटमध्ये मेन्यूकार्ड वाचताना, कधी मासिकाच्या गुळगुळीत पानावर तर कधी पदार्थाच्या वेष्टनावर आणि अनेकदा टीव्हीवर जाहिरातीमध्ये.. हे पूर्णब्रह्म आपल्यासमोर येते आणि नकळत तो पदार्थ उचलला जातो..विकत घेतला जातो. साधे नेहमीचे उदाहरण.. आपले मसाले किंवा डाळी.. सुपर मार्केटमध्ये शेल्फवर हारीने रचलेल्या वस्तूंना पाहात अंदाज घेत जाताना एखाद्या पाकिटाकडे हात जातो.. त्यावरचे चित्र/फोटो पाहून.. मस्त तकतकीत डाळ, वर लालभडक मिरच्यांची फोडणी आणि कोथिंबिरीचा साजशृंगार.. साधी तुरीची डाळ एकदम शाही वाटते आणि आपण विकत घेतोच घेतो..

मराठीतील सर्व खाऊ आनंदे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubha prabhu satam article on art of food presentation
First published on: 30-09-2017 at 01:01 IST