दादरमधल्या एका मध्यमवर्गीय कायस्थ कुटुंबात जन्मलेला मी, सातासमुद्रापलीकडे जातो काय, ‘मास्टरशेफ’सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या स्पर्धेचा परीक्षक होतो काय, स्वत:चा चॉकोलेटचा, मसाल्यांचा ब्रॅण्ड सुरू करतो काय सारंच अविश्वसनीय. सुरुवातीची ‘ताज’मधली दहा र्वष म्हणजे मुक्त विद्यापीठातलं अध्ययन, पुढे समुद्रातल्या निळ्याभोर अनिश्चिततेतला सोळा मजली उंच ‘ओरियाना’मधला शेफ म्हणून प्रवास, ‘ऑर्किड’च्या २६ खोल्यांपासून ते आलिशान हॉटेल होण्यापर्यंतचा प्रवासाचा साक्षीदार, नंतर मित्राचं डब्लिनमधलं रेस्तराँ,  इंग्लंडमधल्या बारा हॉटेल्सच्या साखळीचा एक्झिक्युटिव्ह शेफ, ‘हॉटेल ग्रॅण्ड सरोवर’मध्ये प्रोजेक्ट पातळीपासून काम, पुन्हा कॅनडा, अखेर मायदेशी.. असा भरगच्च अनुभव पाठीशी घेत सुरू झालेल्या या खाद्य प्रवासात मी एक लाखांहून अधिक केक बनवले.. सतत प्रयोग करत, नावीन्याची भर टाकत अनेकांच्या क्षुधा शांत केल्या, तर अनेकांना स्वादांतल्या विविधतेचा आस्वाद दिला. तो प्रवास मलाही तृप्त करून गेला..

कॅनडातल्या एडमंटनमधील ती गारठवणारी संध्याकाळ होती. देशोदेशीचे शेफ तिथे आपली कला सादर करण्यासाठी जमले होते. विविध पदार्थाच्या उत्तम स्वादाचा परिमळ दरवळत होता. एकापाठोपाठ एक पारितोषिके जाहीर होत होती. तृतीय पारितोषिक झालं, द्वितीय पारितोषिक झालं, प्रथम पारितोषिकही जाहीर झालं आणि अचानक निकाल घोषित करणाऱ्या निवेदकानं जाहीर केलं, ‘ज्यूरींकडून एक खास पारितोषिक, जे या स्पर्धेच्याही पलीकडचं होतं, जात आहे मिस्टर

विवेक ताम्हाणे, द शेफ फ्रॉम इंडिया यांना.’ माझ्या आजूबाजूचे मित्र मला सुचवत होते, खुणावत होते. जा मंचावर जा. पाहुणे पारितोषिक द्यायला वाट पाहाताहेत. मी भारावल्यागत गेलो. अनेक पारितोषिके मिळालेली, पण ते काही वेगळेच होते. कारण ते पारितोषिक हाती घेतल्यावर सुरू झालं, ‘जन गण मन!’ दुसऱ्या कोणाहीसाठी त्यांचं राष्ट्रगीत वाजलं नव्हतं. माझ्यासाठी ते वाजलं. विवेक ताम्हाणेचा जन्म धन्य झाला..

दादरमधल्या एका मध्यमवर्गीय कायस्थ कुटुंबात जन्मलेला मी, सातासमुद्रापलीकडे जातो काय, साडेतीन वेळा या अद्भुत निळ्या गोलाची प्रदक्षिणा करतो काय, ‘मास्टरशेफ’सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या स्पर्धेचा परीक्षक होतो काय, स्वत:चा चॉकोलेटचा किंवा मसाल्यांचा ब्रॅण्ड सुरू करतो काय. सारंच नवल होतं.. राष्ट्रगीताचा एकेक शब्द कानावर येताना त्या अठ्ठेचाळीस सेकंदांत हा सारा प्रवास नजरेसमोर तरळून गेला..

या प्रवासाची सुरुवात झाली होती किंग जॉर्ज शाळेत. कार्यानुभवाच्या तासाला आम्हाला बेकिंग हा विषय शिकवला गेला. त्या वेळी तो दरवळ मनात घर करून गेला. मी घरातला मोठा मुलगा. वडिलांची फिरतीची नोकरी, घरात लहान जुळी भावंडं आणि आई. त्यामुळे लहानपणीच जबाबदाऱ्या उचलायची सवय लागलेली. बाजारहाट मी करत असे आणि आईला मदतही! आपसूकच अन्न बनवण्याशी परिचय झाला व मनाशी निर्णय घेतला की आता आपण बारावीनंतर करिअर याच क्षेत्रात करू या. त्यासाठी अवतीभवती चौकशी केल्यावर हॉटेल मॅनेजमेंट करायला हवं असं कळलं. डॅडी व ममाने प्रोत्साहन दिलं. विचार करा, १९८३-८४चा तो काळ होता. त्या वेळी आपला मुलगा स्वयंपाकशास्त्र शिकायला जातोय. त्याला परवानगी कशी द्यायची? पण त्यांनी काळापुढे विचार केला. मी के. सी. कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट केलं. तो कोर्स सुरू असताना माझ्या लक्षात आलं की, मला बेकरी आणि कन्फेक्शनरीची (पेस्ट्रीज, चॉकलेट्स आदी) आवड अधिक आहे. मग त्यासाठी पुण्यातल्या फूड क्राफ्ट इन्स्टिटय़ूट (आता केटिरग कॉलेज)मध्ये बेकरीचा एक वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

प्रा. पुसेगावकर सरांनी स्वयंपाकशास्त्र या विद्येकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. हे काही केवळ जेवण बनवण्याचं शास्त्र नाही, तर ती एक अप्रतिम अशी सर्जनशील कला आहे, याची जाण त्यादरम्यान येत गेली. पुण्यातलं शिक्षण संपता संपता कॅम्पस मुलाखतीत मला ‘ताज’मध्ये नोकरी मिळाली. तसा मी आग्य््रााच्या क्लार्क हॉटेलसाठी, पुण्यातल्या ब्ल्यू डायमंडसाठीही निवडला गेलो होतो. पण ‘ताज’मध्ये जाण्याचा निर्णय मी घेतला, कारण के. सी.तलं शिक्षण संपता संपता मी तिथं इंटर्नशिप केलेली होती. ‘ताज’ म्हणजे एक विद्यापीठ होतं.

मोठय़ा हॉटेलमधलं जीवन पूर्णपणे वेगळं असतं. त्याचे नियम वेगळे असतात. तिथे प्रत्येक क्षणाची पूर्वतयारी असूनही कधी काय अनपेक्षितपणे सामोरं येईल, याची खात्री नसते. त्या काळात कोणत्याही हॉटेलच्या किचनमध्ये काम करायचं म्हणजे एक दिव्य होतं. तुम्ही ज्युनिअर असलात की फक्त सीनिअर शेफ सांगेल त्या पदार्थाना त्याच्या हातात आणून द्यायचं, बस! तुम्ही फक्त मदतनीस. ते तुम्हाला आपली रेसीपी कधीही सांगणार नाहीत. त्या काळात आजच्यासारखी इंटरनेट, यूटय़ूबसारखी माध्यमं नव्हती. त्यात मी पडलो बेकरी आणि कन्फेक्शनरीचा विद्यार्थी. इथं सारं काही अत्यंत प्रमाणात लागतं. एक अधिक एक दोन असंच असतं, चिमूटभर साखर, चवीपुरतं मीठ ही भाषा बेकरी पदार्थाना चालत नाही. तिथं सारं अचूकच असावं लागतं. जरा जरी चूक झाली की पदार्थ फेकूनच द्यायचा. मग आमचे आम्ही मार्ग काढत असू. मी ‘ताज’ला जाताना चर्चगेटहून कित्येकदा चालत जाई. वाटेत रस्त्यात पुस्तक विक्रेते बसलेले असत. आम्ही काही मित्र ती पुस्तकं चाळत असू, ती विकत घेण्याइतके पैसे थोडेच होते? आम्ही त्यातील पाककृती ध्यानात ठेवायचा प्रयत्न करत असू. किती प्रकारचे ब्रेड्स आहेत, केक्स आहेत याची जाण तिथं येत गेली.

‘ताज’मध्ये शेफ नोझर इराणपूर हे पारशी शेफ माझे मेन्टॉर होते. त्यांच्याबरोबर शेफ अरोरा, शेफ ओबेरॉय होते. ही सारी वेगवेगळ्या क्षेत्रांतील माहीर मंडळी. इराणपूर सरांचे बेकरी-कन्फेक्शनरीवर प्रभुत्व, अरोरा सरांचे भारतीय जेवणावर तर ओबेरॉय सरांचे कॉण्टिनेंटलवर प्रभुत्व  होते. या तज्ज्ञ मंडळींनी माझी व्यवसायनिष्ठा पाहून आपला ज्ञानाचा खजिना उघडा केला. वर्षभरात त्यांनी स्वतंत्रपणे काही पदार्थ बनवायला संधी दिली. आम्ही प्रयोग करू लागलो. एकदा मी ऑरेंज मूस बनवली. म्हणजे काय केलं की छानशी संत्री निवडली, त्यांना वरच्या बाजूनं हळुवारपणे सोललं, त्यातील गर काढून घेतला, मूस बनवली, संत्र्याच्या आतली बाजू चमच्यानं साफ केली, धागे काढून त्यात ती मूस परत भरली व ती ग्राहकांना दिली. तो पदार्थ खूप लोकप्रिय झाला. तशाच पद्धतीनं मी पेरू, लिची, ऑरेंज-लिची मूस तयार केली. ती गाजलीही. मी प्रयोग करत होतो.

अन्न हे पूर्णब्रह्म आहे, याची जाणीव मनात होती, या पूर्णब्रह्मावर सातत्याने प्रयोग केले तर, ते प्रसन्न व्हायला फार वेळ जात नाही. कारण प्रयोगातून जगणं समृद्ध होत जातं, याच्यावर माझा विश्वास आहे. त्या प्रयोगातलं पहिलं पाऊल म्हणजे ऑरेंज मूस होतं आणि मग दुसरं पाऊल म्हणजे कॅरॅमल चॉकोलेट. १९८९ मध्ये मी कॅरॅमेल चॉकोलेट ‘ताज’मध्ये पहिल्यांदा तयार केलं. त्या वेळी कॅरॅमल कसं बनवतात हेही माहिती नव्हतं, ते पुस्तकांतून शोधून काढलं. पहिलं कॅरॅमेल चॉकोलेट बनवलं. मग त्यात स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आदी फळं मिसळत नवनवी चॉकोलेट्स बनत गेली. ‘ताज’मध्ये सतत परदेशी शेफ येत असत. त्यांच्याकडून नवीन पदार्थ शिकून घेणे व त्याला भारतीय चवीचा स्वाद देणे असा प्रयोग आम्ही सुरू ठेवला. मेक्सिकोत वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या मिळतात. त्यांचंही जेवण आपल्यासारखं मसालेदार आहे. त्या मिरच्यांची तयार पावडर मिळते, त्यांचा वापर करून काही देशांत चॉकोलेट्स बनत. पण चॉकोलेट सजवून त्यात थेटपणे मिरच्या भरून चिली चॉकोलेट्स तयार करायला मी प्रारंभ केला, हा खास माझा शोध आहे.

ताज हे मोठं व प्रतिष्ठित हॉटेल आहे. तिथे सतत नावीन्यपूर्ण काही करण्याची प्रेरणा मिळत राहते. एकदा ‘खलनायक’ चित्रपटाच्या प्रीमिअरनंतरची पार्टी ताजमध्ये होती. त्या वेळी अगदी नवी कोरी कल्पना प्रत्यक्षात आणत ‘खलनायक’ ही अक्षरं आम्ही बर्फात कोरली होती. ती बघायला लोकांनी प्रचंड गर्दी केली. १९९४ मध्ये ऐश्वर्या रॉयला ‘मिस वर्ल्ड’ किताब मिळाला होता. ती ‘ताज’मध्ये राहणार होती. तिच्यासाठी काही तरी खास करावे, असं कॉर्पोरेट शेफना वाटलं. त्यांनी मला ‘मिस वर्ल्ड’ला मिळालेल्या मुकुटाची चॉकोलेटमधील प्रतिकृती तयार करायला सांगितलं. मी केलीही. ऐश्वर्या चकित आणि खूषही झाली.  ‘ताज’ची दहा र्वष म्हणजे मुक्त विद्यापीठातलं अध्ययन होतं.

त्या वेळी आयुष्यात एक वळण आलं. या वळणानं मला जगभर फिरवलं. तीन वेळा पृथ्वी प्रदक्षिणा झाली, युरोप, स्कँडिनेव्हिअन देश पाहिले, जिवावर बेतणारे प्रसंगही अनुभवले. त्याचं असं झालं की, एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या पार्टीत एक परदेशी कॉर्पोरेट शेफ आला होता. कॉर्पोरेट शेफ म्हणजे सर्वेसर्वा. त्याने मला क्रूझवर शेफ म्हणून येण्याची ऑफर दिली. मी ती उडवून लावली. ‘ताज’ची सुखाची नोकरी सोडून कोण जाणार? पण तरीही तो म्हणाला, ‘‘येत्या रविवारी मुलाखती आहेत,तू ये.’’ रविवारी वेळ होता म्हणून मी त्या मुलाखतीसाठी गेलो. मनात लहानपणापासून सागराचं सुप्त आकर्षण होतंच. मी आठवी ते बारावी सी-कॅडेट होतो. त्या मुलाखतीचं मला औपचारिक बोलावणं नव्हतं. मी शेफच्या निमंत्रणाविषयी सांगितलं व त्याचं कार्ड दिलं. मला एकच प्रश्न विचारला गेला, ‘‘माझ्याकडे कालचा ब्रेडरोल शिल्लक आहे. तो थोडा कडक झाला आहे, असं का?’’ मी म्हणालो, ‘‘कदाचित तो अधिक गरम केला गेला असेल.’’ अनुभवातून आलेलं माझं ते उत्तर मला नोकरी देऊ न गेलं. आता माझ्यासमोर प्रश्न उभा राहिला, एका बाजूला सुखासमाधानाची कायम स्वरूपाची नोकरी की बेलगाम समुद्री अनिश्चिततेला सामोरं जाण्याचं आव्हान! शेवटी आव्हानांना सामोरं जाण्याचं वेडं धाडस करायचं ठरवलं. ते योग्यच ठरलं.. माझ्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला.

समुद्र! एक निळीभोर अनिश्चितता! अफाट खळबळ पोटात साठवणाऱ्या सागराच्या छाताडावरून जाणाऱ्या ‘वास्को द गामा’चं साहस मनात घुसलं होतं. मसाल्याच्या देशाला शोधत तो भारतात आला व ते भारतीय मसाले घेऊन एक साधा शेफ जगाच्या बाजारात उतरत होता. आमचं प्रशिक्षण इंग्लंडमध्ये झालं व आमचं ‘ओरियाना’ जहाज बांधलं जात होतं जर्मनीत. प्रचंड थंडी पडलेली व जवळ फारसे गरम कपडे नव्हते. आम्ही ‘ओरियाना’ जेव्हा पाहिलं तेव्हा ते डॉकमध्ये तयारही झालं नव्हतं. पण त्यानंतर बरोबर आठ दिवसांनी इंग्लंडच्या राणीनं त्या सोळा मजली उंच अशा ‘ओरियाना’ला झेंडा दाखवला व डौलानं ते जहाज अटलांटिकमध्ये घुसलं. आणि माझं मनही..

अद्भुत जग होतं ते. समुद्राच्या आत स्वयंपूर्ण शहर होतं. मला तिथं गेल्यावर कळलं की जहाजात गॅसच्या चुली नसतात, तर तिथं विजेवर चालणारी सर्व उपकरणं असतात. तिथं टेबलं, किचन सारं काही एका जागी घट्ट बांधलेलं असतं. समुद्रातील पाण्याच्या हालचालीने डचमळू नये म्हणून! मला वाटायचं की जहाजावर स्वयंपाक करणं सोप्पं असणार, त्यात कोणतंच आव्हान नाही. रेडिमेड जेवण गरम करून द्यायचं. पण तिथंच साक्षात्कार झाला की हेही किचन नेहमीच्या हॉटेलच्या किचनसारखं असतं. प्रत्येक बंदरावर बाजारहाट केला जातो, स्थानिक भाज्या, फळफळावळ घेतली जाते, त्याची प्रत कशी आहे हे पाहण्यासाठी कधी कधी शेफला बंदरावर जावं लागतं, त्यानिमित्तानं त्याला जग पाहायला मिळतं, अनुभवात भरच पडत जाते. जगभरातील ‘अन्नपूर्णा’ कशा आहेत, याचा मी परिचय करून घेतला.

जहाजावर रोज सकाळी सर्व शेफच्या मीटिंगस् होतात, रोजचा मेन्यू ठरवला जातो, त्यासाठी आवश्यक तयारी आदल्या दिवशीच करून ठेवली जाते, नंतर मेन्यू प्रिंट करतात व तो जहाजभर जातो. एकदा आम्ही भारतीय जेवणाचा बेत ठेवला. किचनमध्ये आम्ही बरेच भारतीय होतो, पण मराठी असा मी एकटाच. आम्ही बटाटय़ाची भाजी, पुरी, श्रीखंड, कोलंबीचं कालवण, गुलाबजाम, शिरा, गाजर हलवा असा जंगी बेत ठेवला. त्यात गडबड अशी झाली की, श्रीखंडासाठी चक्का लावला पण तो नीट लागला नाही. आता आली का पंचाईत! मग मी एक युक्ती केली. त्यात आंब्याचा गर घातला व नाव दिलं, ‘आंबा श्रीखंड!’ लोकांना खूप आवडला , ‘हिट’ झाला. तो मेन्यूचा कायमचा भाग करा, असा आग्रह त्यांनी धरला. पण त्यामागील खरं कारण माहिती असल्यानं मी तसं केलं नाही.

जहाजावर आम्ही कित्येकदा बारा ते चौदा तास काम करत असू. थरारक जीवन होतं ते. एकदा रात्री ११.३०च्या सुमारास अचानक जहाजाच्या इंजीन रूमला आग लागली. मी खूप घाबरलो होतो. पण ती आग वेळीच आटोक्यात आली. नंतर एकदा, अटलांटिक समुद्रात आमची ‘ओरियाना’ प्रवास करत होती. नेमकी ‘मरीन ट्रेंच’ नावाच्या सर्वात खोल भागात आमच्या बोटीची जनित्रं बंद पडली. वेळ दिवसाची होती. वीज गायब. त्यामुळे लिफ्ट बंद, किचन बंद. जहाजावर सुमारे दोन हजार प्रवासी. आता काय करायचं? मग आम्ही थोडं डोकं चालवलं. उपलब्ध फळफळावळ वापरलं. ब्रेड, केक्स यांचा वापर करून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी साखळीनं उभं राहून त्या सोळा मजली जहाजावरील सर्वाना दुपारच्या वेळी खाऊ  घातलं. प्रसंगावधान सर्वात महत्त्वाचं असतं.

जहाजावर साडेतीन-चार र्वष झाली. सुट्टीत घरी आलो असताना मला ‘ऑर्किड’ हॉटेलचा निरोप आला आणि मी जहाज सोडण्याचा निर्णय घेतला. ‘ऑर्किड’च्या प्रारंभापासून मी तिथं रुजू झालो. विठ्ठल कामतांच्या कामाचं वेड माझ्यातही होतं. चार र्वष मी तिथं एक्झिक्युटिव्ह शेफ होतो. त्यांचं २६ खोल्यांपासून ते आलिशान हॉटेल होण्यापर्यंतचा प्रवास मी पाहिलाय. ऑर्किडमध्ये १९९९चा क्रिकेट वर्ल्ड कप सुरू असताना आम्ही आइस्क्रिम महोत्सव भरवला होता. खूप मजा आली त्या टप्प्यातही.

त्या सुमारास डब्लिनमधल्या माझ्या एका मित्रानं नवं हॉटेल थाटलं. त्याने मला तिथं बोलावलं. ते एक मिश्र जेवण देणारं रेस्टॉरंट होतं. तिथं आम्ही ‘मराठी फूड फेस्टिवल’ भरवलं. वेगवेगळ्या उसळी, भाज्या, वडे, यापासून ते श्रीखंडापर्यंत सारं काही बनवलं होतं. त्यात मराठी मसालेदार पदार्थाना थोडं कमी तिखट बनवून लोकांना खाऊ  घातलं. तो उत्सव इतका गाजला की, तिथल्या अनेक महत्त्वाच्या दैनिकांनी त्यावर स्टोरी केल्या. युरोपातील एका ‘वर्मिलिऑन’ नावाच्या नियतकालिकानं आमच्या डब्लिनमधल्या रेस्तराँची पहिल्या दहा रेस्तराँत निवड केली होती.

लोकांच्या समाधानाचा रस्ता पोटातून जातो. माणूस हा मुळातच चवीनं खाणारा प्राणी आहे. खरं म्हणजे पृथ्वीतलावरचं सर्व काही तो खातो. पण त्याची खाद्य-संस्कृती अन्य प्राण्यांपेक्षा वेगळी आहे. संस्कृती हा शब्दच माणसाला प्राण्यापासून वेगळा करतो. जे निसर्गात असतं ती प्रकृती, त्यात बिघाड करणं म्हणजे विकृती तर निसर्गावर संस्कार करून त्यात सुधार घडवणं म्हणजे संस्कृती. त्याच्या कल्पकतेचा पहिला बहर म्हणजे खाद्य-संस्कृतीला जन्म देणं!

मला तीव्रतेनं वाटतं, की आपण आपल्या पदार्थाना, प्रमाणीकरण (२३ंल्लिं१्िर९ं३्रल्ल) करून जगभरात पोचवलं पाहिजे, आपल्या चवदार मसाल्यांना जगभरात मान्यता मिळवून दिली पाहिजे. आपल्या इतकी विविधता फार क्वचित आढळते. एका राष्ट्रात अनेक राष्ट्रे दडलेला आपला देश चवीच्या बाबतीत सर्वाधिक समृद्ध आहे. पण आपले पदार्थ, जागतिक बाजारात आणायला आपण कचरतो. मराठी माणसांची, मराठी पदार्थ देणारी मोठमोठी हॉटेल आहेत, त्यांचं ब्रॅण्डिंग करायला हवं, ते वाजतगाजत जागतिक स्तरावर मांडले गेले पाहिजे.

युरोपात, इंग्लंडमध्ये आपण कुठे राहतो यापेक्षा आपण कुठे व काय जेवतो यावर अधिक भर दिला जातो. डब्लिननंतर मी इंग्लंडमध्ये गेलो. तिथं बारा हॉटेल्सच्या एका साखळीचा मी एक्झिक्युटिव्ह शेफ झालो. मी एकटाच भारतीय होतो व जेवण सारं कॉन्टिनेन्ट्ल होतं. मी माझ्या आवडीनुसार बेकरी आणि कन्फेक्शनरीमध्ये नवनवं ज्ञान मिळवत होतो. हे ज्ञान मिळवून मी मायदेशी परतलो, ‘हॉटेल ग्रॅण्ड सरोवर’मध्ये प्रोजेक्ट पातळीपासून काम केलं. ते उभं केलं व मग कॅनडात कायमचं वास्तव्य करायचं ठरवून गेलो. एक वर्ष काढलं, पण तिथली थंडी मला रुचली नाही. मी परतलो. कॅनडात एक अनुभव मात्र असा आला की आजही अंगावर रोमांच उभे राहतात. एडमंटनमध्ये त्या स्पर्धेत मी भाग घेतला. साधीशी पण रुचकर चिकनची एक डिश मी बनवली होती. तिच्या पोटात मी मश्रूम भरलं, सॉसेजेस घातली व मस्त चवदार पदार्थ बनला. त्यालाच बक्षीस मिळालं.

मला कन्फेक्शनरी पदार्थात रस आहे. बेकरी पदार्थ करायला मला आवडतं. लाखांहून अधिक केक मी बनवले आहेत. आतापर्यंत मी सर्वात मोठा केक बनवलाय तो ४८ किलो वजनाचा!

आता मी मला मिळालेलं अनुभवजन्य ज्ञान मी पुस्तकरूपाने वाटायचं ठरवलं आहे. मला मसाल्यांमध्येही खूप रुची होती. त्यामुळे विविध ठिकाणचे मसाले, इथे मुंबईत उपलब्ध सामग्रीतून कसे बनवता येतील, हे मांडण्याचा प्रयत्न मी काही सदरांतून केला आहे. आपल्या येथे गृहिणी स्वयंपाकघर सांभाळते, काहीशी अन्यायकारक असली तरीही सत्य स्थिती आहे. अशा गृहिणींसाठी मी लेखन केलंय. कोणताही पदार्थ चवदार होण्यासाठी आपण ताजे ताजे बनलेले मसाले वापरले पाहिजेत. ताज्या मसाल्यात धण्याची पूड भरपूर वापरावी, कोथिंबिरीची ताजी पानं सुकवून ती मसाल्यात वापरायला हवीत, लाल मिरची घरात सुकवून, तिची पूड करून जेवणात वापरली तर तिची चव अफलातून लागते. कांदा, लसूण हे पदार्थ सुकवावेत कसे याविषयी माझी काही निरीक्षणे आहेत, ती मी पुस्तकांत लिहिली आहेत. आमच्या सी.के.पी. मसाल्यात बडिशेपची चव लागायलाच हवी, पण ती प्रारंभी नव्हे तर जेवण झाल्यावर ती चव जीभेवर रेंगाळली पाहिजे तर त्या चवीला यश! ते कसे जमवायचे, याच्या काही छोटय़ाशा क्लृप्त्या या पुस्तकांत सांगितलेल्या आहेत. आपल्याकडच्या गृहिणींच नव्हे तर सर्वाना पाककृती जमायला हवी. यासाठी छोटी छोटी कौशल्ये शिकवण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्याला किचन सांभाळता आलं त्याला जगात काहीही उत्तमरीत्या सांभाळता येतं, हा माझा विश्वास आहे. आजचा तरुण किंवा तरुणी, हे स्वयंपूर्ण व स्वयंरोजगारनिर्मिती कशी करू शकेल, यासाठी मी विचार करतोय, ठिकठिकाणी व्याख्याने देतोय, हा विषय मांडतोय, स्पर्धाना जातोय. आता तर मी स्वतंत्र पुस्तकलेखन करून त्याद्वारे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. अर्धशतकाच्या या आयुष्याच्या प्रवासात अन्नपूर्णेनं जे दिलं ते, सर्व सामान्य लोकांना देणारं एका छोटंसं माध्यम आहे मी!

मला जे आवडलं, ते मी केलं तोच मुख्य प्रवास झाला. स्वत:ची आवडच स्वत:ला घडवते, माझ्या बाबतीत ते तंतोतंत खरं झालय!

शेफ : विवेक ताम्हाणे

nitinarekar@gmail.com

शब्दांकन : प्रा. नितीन आरेकर