आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.

सणासुदीचे दिवस आले की, घरातील काही पदार्थाची आवर्जून खातरजमा केली जाते. नैवेद्याचं ताट सजणार, पैपाहुणे येणार म्हटल्यावर दरदिवशी नवा बेत होतोच पण तरीही ताटात काही पदार्थ मात्र अगदी रोज हवे असतात. या ‘पाहिजेतच’ वर्गातला सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पापड. सणासुदीला सामान भरणाऱ्या गृहिणी पापडाची खातरजमा करणारच. खास पंगतीचं पान असो वा नुसता खिचडीचा बेत असो, आपला कुरकुरीत चटपटीतपणा घेऊन पापड हजर असतो. पापड हा पु.लं.च्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधल्या नारायणासारखा आहे. सर्वकार्येषु सर्वदा, सदैव तत्पर.

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
Do you know Swordbilled hummingbird The title bird with the longest beak in the world read about this everything
जगातील सर्वात लांब चोच असणारा पक्षी कोणता माहितीय का? जाणून घ्या….
What is the hottest place on earth
पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण कोणते आहे? येथे माणूस राहू शकतो का? जाणून घ्या येथे किती आहे तापमान?

आजारी पडलाय, तोंडाला चव नाही. खिचडी किंवा मऊ भातासोबत पापड तोंडी लावा. हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर देऊन बराच वेळ झालाय, पापडासोबत पोटातल्या भुकेल्या कावळ्यांना शांत करा. बाप्पाच्या प्रसादाचं ताट सजलंय पण काहीतरी कमी आहे, गोल गरगरीत कुरकुरीत पापड नैवेद्याला लावा. नैवेद्याचं ताट कसं साजरं दिसू लागतं. लहान बाळाचे जेवणाचे नखरे सुरू आहेत, हातात पापडाचा तुकडा द्या. बाळ पापडासह खिमटी गटकवू लागतो आणि म्हणूनच पापड घरातल्या जिन्नसांमधील आवश्यक गोष्ट बनून जातो.

पापड आपल्या आहाराचा भाग नेमका कधीपासून बनला याचा निश्चित कालावधी सांगता येत नाही, पण संस्कृत पर्पट, तामिळ पाप्पटम ते पापड असा त्याचा प्रवास फार जुना आहे. थेट बौद्धकाळापासून पापडाचा उल्लेख साहित्यात झालेला दिसतो. १३व्या शतकातील कानडी मराठी साहित्यात पापडाची वर्णने येतात. पापड अनेकविध धान्यांशी जोडला गेला असला तरी उडीद डाळीशी त्याचे नाते खास आहे. यासंदर्भात गुप्तकाळानंतरचा एक उल्लेख महत्त्वाचा वाटतो. या काळात एक फार मोठा वर्ग पूर्ण शाकाहारी होता. हा वर्ग मांसभक्षणापेक्षा उडीद खा असे सांगायचा. उडदाचा या अंगाने वाढता वापर पाहता पापड हा आहाराचा आवश्यक भाग झाला यालाही महत्त्व आहे. १५व्या शतकापर्यंत भारतीयांना मिरची माहीत नव्हती हा इतिहासकारांचा निष्कर्ष पाहता तिखटपणासाठी पापडात काळीमिरी इतकी खास का याचंही उत्तर मिळतं. एकूणच पापडाच्या प्राचीनत्वाचे सारे पुरावे मिळतात.

उभ्या आडव्या भारतात पापड हा सर्वसंचारी आहे. पापडम, अप्पडम, पांपड, हप्पाला त्याला काही म्हणा पण तो सर्वाचा लाडका आहे.प्रांताप्रांतात तो आपले विविध रंग दाखवतो. राजस्थानात तो अगदी मोठ्ठा असतो तर दाक्षिणेत तळहाताएवढा लहान. उत्तरेत त्याला भाजून खाणं पसंत करतात तर दक्षिणेत तळून. प्रांताप्रांतातील तिखट सोसण्याच्या क्षमतेनुसार त्यातली काळीमिरी कमी जास्त होत जाते. उडीद, मूग, पोहे, बटाटे, तांदूळ, नाचणी, फणस हे आणि असे म्हणाल ते वैविध्य पापड पेश करतो.

आज दुकानातून घरी येणारी पापडाची पाकिटं आणि पूर्वी घरोघरी लाटले जाणारे, वाळवले जाणारे पापड याची नाही म्हटली तरी मनात तुलना होते. पाकिटातले पापड ही सोय आहे तर वाळवणाचे पापड हा सोहळा आहे. पापड लाटणं, वाळवणं या निमित्ताने सगळं घर, शेजारपाजार एकत्र जमल्याने सामूहिक कामातून ऋणानुबंधाच्या ज्या गाठी जोडल्या जायच्या त्या पापड लाटण्याच्या कष्टांपेक्षा जास्त सुखद होत्या. पापडाचा घाट इतका व्यापणारा म्हणून तर मैने इतने पापड बेले है सारखा वाक्प्रचार रूढ झाला. पण हा व्याप सगळ्यांच्या मदतीने पापड बेलताना, लाटताना जाणवायचा नाही. या अर्थाने गृहिणीच्या मनातलं पापडाचं स्थान खूपच वेगळं आहे. नातेसंबंध जोडणारं, मजबूत करणारं आहे.

आज हा पापड भारतातच नाही तर अगदी देशविदेशात इंडियन स्टार्टर, क्रिस्पी डीप विथ मँगो चटणी असा भाव खाऊ  लागला आहे. पण तरी प्रत्येक भारतीय घरात पापडाचा डबा आजही अढळ स्थान पटकावून आहे. डॉक्टरांनी नाही सांगितलंय, डाएट सुरू आहे. तळणाचे पदार्थ कमी केलेत अशा कोणत्याही कारणांचा या स्थानावर परिणाम होत नाही हे विशेष. काही माणसं असतात अशी की ज्यांच्याविषयी घरातला कोणताही समारंभ, कोणताही सोहळा संभवतच नाही. पापड अशाच काका, मामा, भाऊ, दादा, तात्या, अण्णा, नानांचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे बाकीच्या पदार्थाकडे जितक्या निगुतीने पाहिलं जातं तितकं पापडाकडे पाहिलं जात नाही हे खरंय! सगळं पान सजल्यावर अगं बाई, पापड राहिलेत अशी आठवण अगदी शेवटी येते पण तरी तो हवाच. सगळं जेवण तय्यार आहे. पापड तळले की झालं! यात त्याची इतिकर्तव्यता आहे.

नावडती भाजी आवडती करण्याच्या मोहिमेवर तोंडी लावणं म्हणून तो कामगिरी बजावतो. तापलेल्या तेलात त्याचं फुलत जाणारं अंग आपल्याला बाकी काहीही व कसंही असो पण तरी जेवणाला कुरकुरीत आधार आहे. ही जी खात्री देतो ना त्यामुळेच त्याचा तुकडा मोडला जातो. हक्कानं. विश्वासानं.