आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.

वर्षांनुर्वष भारतीय घरांत तयार होणाऱ्या पदार्थाना अचानक एक नवं रूप मिळून आकर्षक पद्धतीने ते जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा त्या पदार्थाला आलेल्या ऊर्जितावस्थेचं कौतुक वाटल्याशिवाय राहात नाही. एकेकाळी घरच्या घरी तयार होणारा पदार्थ मार्केटिंगच्या तंत्राने प्रांतसीमा ओलांडून घराघरात पोचेल याची आपण कल्पनाही केलेली नसते, पण तसं प्रत्यक्षात घडतं. विशिष्ट प्रांताची खाद्यसंस्कृती संपूर्ण देशभरात किंवा जगभरात पसरणं हा आनंददायी अनुभव असतो. गुजराती खाखऱ्याला हे भाग्य लाभलंय. मराठी चकली जशी दिवाळी किंवा पाहुण्यांसाठीचा खास खाऊ  अशा छापातून बाहेर पडत स्वयंपाकघरातील डब्यातून उडी मारून दुकानांमध्यल्या पाकिटांत येऊन बसलीय तसंच खाखऱ्याचंही आहे.

गुजराती मंडळींच्या आहारात खाखऱ्याचं स्थानमाहात्म्य नव्याने सांगायला नको. सकाळच्या नाश्त्यात तो चहाचा सोबती होतो, पण तसा त्याला स्थळ काळ वेळ याचा मज्जाव नाही. हा पदार्थ कसा, कधी निर्माण झाला याचे दाखले नाहीत. साधारणपणे असं म्हणता येईल की, स्वयंपाकघरातील चुकल्यामाकल्या किंवा गरजेपोटी तयार पदार्थालाच अधिक नेटकं रूप देत खाखरा जन्माला आला असावा. गुजराती जेवण रोटली अने फुलकाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कुठल्याही घरात जेवणवेळेआधी डोकावल्यास, मुबलक तुपाची धार सोडत रोटली शेकणारी स्त्री आणि बाजूला रोटय़ांची चळत हे दृश्य सहज दिसते. कोणा एका गुर्जर स्त्रीकडून उरलेल्या रोटी सकाळच्या नाश्त्याला शेकून खाऊ  घालता घालता त्या फारच कुरकुरीत झाल्या आणि चक्क सगळ्यांना आवडून गेल्या असाव्या व त्यातूनच पुढे खाखऱ्याचा जन्म झाला असावा असा अंदाज काही मंडळी मांडताना दिसतात. म्हणजे विशिष्ट एक पदार्थ तयार करावा या भूमिकेतून नाही तर सहज टाकाऊतून टिकाऊ  निर्माण करता करता खाखरा जन्माला आला असं म्हणायला पूर्ण वाव आहे. या खाखऱ्याने आज गुर्जर बांधवांचीच नाही तर सर्वाचीच मनं जिंकून घेतली आहेत. या पदार्थाच्या निर्मितीचे श्रेय कुणा एकीचे नाही. कुणा एकीने करून पाहिले, दुसरीने अनुकरण करत स्वत:ची भर टाकली व या साखळीतून खाखरा लोकप्रिय होत गेला.

कडक फुलका, पापड रोटी या नावानेसुद्धा खाखरा ओळखला जातो. खाखरा शब्द नेमकं काय सांगतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात हाती लागलेला संदर्भ असा की खँखरा नामक रुंद तोंडाचा भांडय़ाचा एक प्रकारही आहे व दुसरा अर्थ होतो पातळ. खाखऱ्याची पातळ देहयष्टी पाहता त्या अर्थाने हा शब्द वापरला गेल्याची शक्यता जास्त वाटते.

पदार्थाचं मूळ कितीही खोलवर, दूरवर पसरलेलं असो पण काळानुरूप त्या पदार्थाला कसं वळवलं जातं, यावर त्याचा बहर अवलंबून असतो. गुर्जर बांधवांच्या उपजत मार्केटिंग तंत्राचा खाखऱ्याला निश्चित फायदा झाला आहे, पण केवळ मार्केटिंग नाही तर जोडीला आधुनिकताही आहे. पारंपरिक मेथी खाखरा, मसाला खाखरा, जिरा खाखरा यांच्यासह पावभाजी खाखरा, पाणीपुरी खाखरा, शेजवान खाखरा, डोसा खाखरा अशा आधुनिक स्वादांची दिलेली जोड जुन्याच नव्हे तर नव्या पिढीलाही खाखऱ्याशी बांधून ठेवते. फास्टफूड जंकफूडचं आक्रमण होऊनही खाखरा गुर्जर समाजाच्या आहाराचा आजही तितकाच महत्त्वपूर्ण भाग आहे.

केवळ खाखऱ्याच्या स्वादावरच या मंडळींनी प्रयोग केलेले नाहीत तर बांधणीचं तंत्रही छान सांभाळलंय. मध्यंतरी एका गृहस्थांनी एसएमएस खाखरा आणून दिला. नावावरून थोडंसं गोंधळायला झालं. पाहिल्यावर लक्षात आलं की, पारंपरिक गोलाकार खाखऱ्याला मोबाइल आकारात बसवून चकचकीत रॅपरमध्ये त्याचं मस्त पॅकिंग केलं होतं. हा एसएमएस किंवा मोबाइल खाखरा. शब्दश: मोबाइल. छोटय़ाशा आकारामुळे कधीही कुठेही केव्हाही खाता येणारा. या कल्पकतेचं कौतुक करायलाच हवं.

आजकाल संतुलित आहाराचं महत्त्व सांगताना डॉक्टर मंडळी सकाळच्या नाश्त्यात खाखऱ्याचा पर्याय आवर्जून सुचवतात. चहासोबत खाखरा शोभतोच पण एखाद्याला तो फार कोरडा वाटल्यास त्याला दही किंवा लोणच्याची पुरवणी दिली जाते. खाखरा- पापड की चुरीतल्या चुऱ्यात तेल, मीठ, तिखटाची भर पडते. नवी पिढी या खाखरा बेसवर बहुढंगी प्रयोग करत त्याला मिनी पिझ्झ्याप्रमाणे आकर्षक करते.

एकूण काय तर कुरकुरीत, चटपटीत, झटपट व पौष्टिक असं थोडक्यात खाखऱ्याचं वर्णन करता येऊ  शकतं. पापडाप्रमाणेच खाखऱ्यानेही अनेक स्त्रियांना रोजगार मिळवून दिला आहे. आज खाखरा गुजरातची सीमा ओलांडून विविध प्रांतांत घरोबा करताना दिसू लागला आहे. प्रवासात थोडंसं कुरुमकुरुम करण्यासाठी मोडलेला तुकडा असो वा गुजराती नाश्ता असो, भुकेला काही काळ थोपवण्याचा कुरकुरीत अनुभव खाखरा नक्की देतो. चाय पिवानु. खाखरा खावानु.. एटले मज्जानी लाइफ.