अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २७ एप्रिल रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी शुक्रवारअखेर १४ जागांसाठी १४३ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकर, वर्षां उसगावकर, निवेदिता सराफ, गजेंद्र अहिरे, मिलिंद गवळी, पूजा पवार यांच्यासह अनेक दिग्गजांनी मोच्रेबांधणी केली आहे. यंदाही निवडणुकीमध्ये पॅनेल करण्याची तयारी असून, यामध्ये काही माजी संचालक आघाडीवर आहेत.
चित्रपट महामंडळाच्या १४ संचालकांच्या जागांसाठी ३९०४ सभासद मतदान करणार आहेत. दरम्यान, दि. ८ मार्चपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी दि. २८ मार्चपासून अर्ज विक्रीला सुरुवात झाली होती. महामंडळाच्या कोल्हापुरातील मुख्य कार्यालयासह मुंबई व पुणे येथील शाखा कार्यालयातही अर्ज विक्री करण्यात आली. यामध्ये आजअखेर १४ जागांसाठी १४३ अर्ज दाखल झाले असून, १ लाख ४३ हजार रु. अनामत रक्कम महामंडळाकडे जमा झाली आहे.
या वर्षी मुंबईतील सेलिब्रिटी निर्माता, कलाकार, दिग्दर्शकही महामंडळाच्या संचालक मंडळावर येण्यास इच्छुक असल्यामुळे मुंबईतील सभासदांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
संभाव्य पॅनेलची घोषणा
यंदाही निवडणुकीमध्ये पॅनेलची तयारी जोरात सुरू असून यामध्ये माजी संचालक विजय कोंडके यांनी ‘विजय कोंडके पॅनेल’, विजय पाटकर यांनी ‘क्रियाशील’ पॅनेल, तर चित्रपट बचाव कृती समितीचे मेघराज भोसले यांनी ‘समर्थ’ पॅनेलची घोषणा केली आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या प्रसाद सुर्वे यांनीही आपला अर्ज दाखल केला असून, ते देखील लवकरच पॅनेलची घोषणा करणार आहेत.