युरोपीय देशातील ‘व्हॅलेन्टाइन डे’ यंदा कृष्णाकाठी फुललेल्या गुलाबांसवे साजरा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिरोळ तालुक्यातून युरोपात तब्बल २० लाख गुलाबांची निर्यात सुरू झाली आहे. या फुलशेतीच्या निर्यातीमुळे भारताला परकीय चलनही मोठय़ा प्रमाणात मिळणार आहे. परदेशातील या फुलवारीसह या तालुक्यातून देशभरातील महानगरांमध्येही १० लाख गुलांबाची फुले पाठवणीच्या तयारीत आहेत.
‘व्हॅलेन्टाइन डे’ आणि गुलाबाचे नाते सर्वश्रुत आहे. यासाठी कळीदार गुलाबास मोठी मागणी असते. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया खंडातील देश यामध्ये आघाडीवर असतात. या संधीचे सोने करण्याचा फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. कोल्हापूर जिल्हय़ाच्या पूर्वेकडे असलेल्या शिरोळ तालुक्यातील कृष्णा-पंचगंगा नदीकाठच्या दोन फुलशेती समूहांनी ही संधी अनेक वष्रे साधली आहे.
कोंडीग्रे गावच्या उजाड माळरानामध्ये ‘श्रीवर्धन बायोटेक’ ही हरितगृहातील गुलाब शेती दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिवंगत आमदार आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी फुलवली. १०० एकराहून अधिक क्षेत्रावर असलेली ही फुलशेती सध्या त्यांचे पुत्र गणपतराव पाटील पाहतात. शोभेच्या, सजावटीच्या अनेक फुलांच्या जातीबरोबरच इथे मोठय़ा प्रमाणात गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. यातील  ‘डच व्हरायटी’च्या ‘बीग बी’ या गुलाब पुष्पास इंग्लड, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, जपान आदी देशांत मोठी मागणी असते. यंदा ‘व्हॅलेन्टाइन डे’च्या निमित्ताने युरोपात या जातीची तब्बल १० लाख फुले निर्यात केली आहेत. तसेच सुमारे ३ लाख गुलाब फुले मुंबई, दिल्ली, बेंगलोर, पुणे, नागपूर बाजारपेठेत पाठवली जात आहे.
दुसरीकडे ‘घोडावत अॅग्रो’ उद्योग समूहातून २५ लाख फुले देश-विदेशात पोहोचविण्याची लगीन घाई सुरू आहे. यातील सुमारे १२ लाख गुलाब फुले जगभरातील बाजारपेठेत पोहोचवली जाणार आहेत. येथील १५० एकरामध्ये गुलाब, जरबेरा, कान्रेशन, ऑरकिड, शेवंती अशा फुलांचे उत्पादन घेण्याकडे उद्योजक संजय घोडावत, नीता घोडावत व कार्यकारी संचालक श्रेणिक घोडावत यांचा कटाक्ष आहे. याशिवाय देशातील महानगरांमध्ये १० लाखांहून अधिक गुलाब पुष्पाचा पुरवठा केला जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कोटेचा यांनी सांगितले.
शिरोळ तालुक्यातील या दोन मोठय़ा हरितगृह पुष्प शेती उद्योग समूहाच्या या वेगळय़ा मार्गाने शेती करण्याच्या ध्यासामुळे ग्रामीण भागातील एक हजारहून अधिक महिलांना कायमस्वरुपी रोजगार मिळाला आहे. तसेच गुलाबासह विविध प्रकारची फुले, भाजीपाला यांच्या निर्यातीतून भारताला परकीय चलनही मिळत आहे.