कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या मंगळवारचा एक दिवस बाकी असताना आज २१८ उमेदवारांनी ३३२ अर्ज दाखल केले. गांधी मैदान विभागीय कार्यालयात ३१ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. मंगळवार हा नवरात्रोत्सवातील पहिला दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक विभागाने तशी तयारी केली आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून एव्हीएम मशिन (मतदान यंत्र) शहरात दाखल झाल्या असून बुधवारी त्या ताब्यात घेतल्या जाणार आहेत. तसेच निवडणूक विभागाने पुरवणी यादीमध्ये ४ हजार २६० मतदारांची नावे वाढविली असल्याची माहिती सोमवारी देण्यात आली.
महापालिका निवडणुकीसाठी ६ ते १३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. ६ तारखेपासून ते आज सोमवापर्यंत पितृपक्ष असल्याने अर्ज भरण्याकडे कानाडोळा केला जात होता. मंगळवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्याच घटस्थापना होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधत बहुतेक उमेदवारांनी अर्ज भरण्याची जय्यत तयारी केली आहे. उद्याची गर्दी लक्षात घेऊन निवडणूक विभागानेही जय्यत तयारी केली आहे.
सोमवारी २१८ उमेदवारांनी ३३२ अर्ज दाखल केले. गांधी मदान विभागीय कार्यालयात सर्वाधिक ४१ तर कसबा बावडा विभागीय कार्यालयात सर्वात कमी १५ उमेदवारांनी अर्ज भरले. आत्तापर्यंत सातही विभागीय कार्यालयात ६५८ अर्जाची विक्री झाली आहे. उद्या दुपारी २ वाजता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत संपणार असून तोपर्यंत किती अर्ज भरले जातात, याकडे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदार यादीतील घोळामुळे उमेदवारांसह मतदारही त्रस्त झाले होते. सुमारे ४० हजार मतदारांची नावे या प्रभागातून त्या प्रभागात जाणे, दुबार नोंदणी होणे, यादीत नाव नसणे असे गंभीर प्रकार घडले होते. या विरोधात जोरदार तक्रार झाल्यानंतर प्रशासनाने या कामामध्ये सुधारणा केली. मात्र, त्यानंतरही आणखी काही समस्या असल्याच्या तक्रारी सुरूच राहिल्या. त्याची दखल घेऊन प्रशासनाने ४ हजार २६० मतदारांच्या नावांचा समावेश असलेली पुरवणी यादी तयार केली आहे. ही यादी सोमवारी रात्री वेबसाईटवर ठेवली जाणार आहे, तर उद्यापासून विभागीय कार्यालयामध्ये ती पाहता येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ७०० एव्हीएम मशिन पाठविल्या आहेत. त्या ताब्यात घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून या मशिन घेतल्या जाणार आहेत.