मंगळवारपासून दिवाळी सुरू होत असल्याने नगरसेवकांची सणातील व्यस्तता गृहीत धरून सोमवारी महापौर निवडीच्या हालचालींवर आणखी एक हात फिरवला गेला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संयुक्त बैठक होऊन महापौर निवड एकमताने करण्याचा पुनरुच्चार केला गेला. तर भाजपचा महापौर निवडण्याच्या दृष्टीने भाजप-ताराराणी आघाडीचे प्रयत्न जारी राहिले.
येत्या सोमवारी (१६ नोव्हेंबर) महापौर निवडीसाठी सभा होणार आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी संयुक्तरीत्या महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महापौरपद काँग्रेसकडे दिले जाणार आहे. तर या प्रयत्नांना शह देण्यासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पडद्याआडून हालचाली सुरू केल्या आहेत. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र अशी बैठक होणार नसल्याचे त्यांनीच स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा मिळविणे, त्यांचे काही सदस्य अनुपस्थित राहणे वा काही सदस्यांनी भाजपच्या बाजूने मतदान करणे अशा विविध प्रकारची व्यूहरचना पालकमंत्र्यांनी रचली आहे. या दिशेने त्यांचे प्रयत्न सोमवारीही सुरू होते.
मंगळवारपासून दिवाळी सुरू होणार आहे. नरकचतुर्दशी ते भाऊबीज असे सलग चार दिवस सणाचे असल्याने नवनिर्वाचित नगरसेवकांनी कुटुंबीय, मित्रपरिवार व नागरिकांसमवेत दिवाळी साजरी करण्याचा बेत आखला आहे. त्यांची सणाची व्यस्तता लक्षात घेऊन सोमवारी दोन्ही काँग्रेसने एकत्रित बठक घेतली. नगरसेवकांची भूमिका अजमावून एकत्रित कारभार करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.