अधिकारी ऐकत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री स्वत:चे अपयश कबूल करीत आहेत. भाजपमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण? याची तयारी आत्ताच सुरू झाली असून, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर राज्यसरकार अल्पमतात येईल, असा पुनरुच्चार करताना, काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकार व विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात काँग्रेसची ताकद दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
वाठार (ता. कराड) येथील वातानुकूलित ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन व १३ कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ अशा कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून चव्हाण बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, माथाडी कामगारांचे नेते पोपटराव पाटील, जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आदींची या वेळी उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले, की दुष्काळप्रश्नी सरकार अपयशी ठरले असून, कुणाचा कुणाला पायपोस नाही, शेतमालाच्या किमती दाबल्या गेल्या आहेत. कधी चिक्की घोटाळा, तर कधी थोर महात्म्यांच्या फोटो खरेदीमध्ये भ्रष्टाचार. अशा वातावरणात अधिकारी ऐकत नाहीत असे सांगणारा केविलवाणा मुख्यमंत्री पाहायला मिळत आहे.