केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वत्र कमालीची अस्वस्थता आहे. परिणामी, विविध घटकांच्या निघणाऱ्या व्यापक मोर्चातून जनतेतील खदखद उफाळून येत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र घडतो आहे म्हणणाऱ्या राज्यकर्त्यांना महाराष्ट्र बिघडतो आहे हे समजेना झाले आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासनावर केली. पश्चिम महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी विकासात असमतोल राखला आहे. आता हे सरकार गेले उडत असे म्हणण्याची राज्यावर वेळ आली आहे, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विकासाच्या दाव्यावर तोफ डागली.

जयसिंगपूर नगरपालिकेने महाराष्ट्र वैशिष्टय़पूर्ण योजनेतून साडेसात कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक नाटय़गृहाची निर्मिती केली आहे. सहकारमहर्षी श्यामराव पाटील यड्रावकर नाटय़गृहाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले.

त्यानंतर नाटय़गृहात झालेल्या कार्यक्रमात पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले. जयसिंगपूर नगरपालिकेच्या विकासाभिमुख कार्यप्रणालीची त्यांनी प्रशंसा केली. आगामी नगरपालिका निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून लढवली जाईल याचे स्पष्ट संकेत या कार्यक्रमातून प्राप्त झाले. आमदार जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, संयोजक राजेंद्र पाटील यड्रावकर, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, रावसाहेब पाटील बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विकासात्मक कामे केल्यामुळे भविष्यात पालिकेतील सत्ता आमचीच असेल असा विश्वास व्यक्त केला. आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पालिकेतील पक्षप्रतोद संजय पाटील यांनी केले. आभार अस्लम फरास यांनी मानले.

आंदोलकांना अटक, सुटका

जयसिंगपूर पालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या नाटय़गृहाला राजर्षी शाहूमहाराज यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी भाजपच्या वतीने नाटय़गृहाच्या उद्घाटनप्रसंगी हातात फलक घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना कार्यक्रमापूर्वीच सहाव्या गल्लीतच अडवले. यड्रावकर समर्थक व विरोधक आमनेसामने आल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही गटांकडून प्रचंड घोषणाबाजी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. ताकीद देऊन नंतर आंदोलकांना सोडण्यात आले.