चंद्रकांत पाटील यांची माहिती

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसंदर्भात मतदान कोणाला करायचे हे ठरवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना नेत्यांना नवी दिल्लीला बोलावून घेऊन चर्चा करतील, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

गुढीपाडव्यानंतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मित्रपक्षांच्या नेत्यांसाठी स्न्ोहभोजनाचे आयोजन केले आहे. या वेळी भाजपकडून घटकपक्षांशी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची गरज मित्रपक्ष वर्तुळातून व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर संजय राऊत यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा मातोश्रीवरच होईल, असे मत व्यक्त केले आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यात सुसंवाद राहावा यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मंत्री गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांना भेटून पाडवा निमंत्रण देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही पक्षांचे संबंध सुरळीत असल्याने मातोश्रीवर जाण्याचे प्रयोजन नसल्याचे रविवारी म्हटले होते. त्यावर राऊत यांनी मातोश्रीवरही उत्तम भोजन आणि पाहुणचार केला जातो, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला होता. याबाबत आज चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसंदर्भात मतदान कोणाला करायचे हा मुद्दा आपल्या अखत्यारीत नाही पण या बाबतचा निर्णय घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना नेत्यांना नवी दिल्लीला बोलावून घेऊन चर्चा करतील, असे मत व्यक्त केले.