शरद पवार यांचा प्रश्न

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पंचांग घेऊन भविष्य सांगायचा व्यवसाय कधीपासून सुरू केला, हे मला माहीत नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शहा यांच्या विधानाची खिल्ली उडवली. सत्तेवर कोणता पक्ष किती दिवस राहणार याचा निर्णय जनताच करेल, अशी टिपणीही त्यांनी केली.

देशातील व राज्यातील राजकीय घडामोडींवर पवार पत्रकारांशी बोलत होते. पुढील ५० वष्रे देशात भारतीय जनता पक्षाचेच सरकार राहील असे अमित शहा यांनी नुकतेच म्हटले आहे. या विधानाची खिल्ली उडवत पवार यांनी वरील विधान केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात बेबनाव निर्माण झाला आहे. यावर भूमिका स्पष्ट करताना पवार यांनी शेट्टी यांची बाजू घेत पवार म्हणाले, की लोकसभेमध्ये शेट्टी यांचे काम दिसते. शेतकऱ्यांच्या हितासाठी खोत यांनी काही काम केल्याची मला कल्पना नाही. त्यांनी शेतकरी आंदोलनात लाठय़ाकाठय़ा खाल्ल्याची वा मारहाण झाल्यामुळे इस्पितळात दाखल झाल्याची देखील माहिती नाही.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी त्यावर काहीही उत्तर न देता हसत सूचक मौन धारण केले. त्यांना आपले मंत्रीपद देऊ केलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर त्यांनी हे सत्तेचे एकप्रकारे विकेंद्रीकरण असून चांगले असल्याचे मिष्किलपणे सांगत चिमटा काढला.

गुजरातमधून निवडून द्यावयाच्या राज्यसभा निवडणुकीतील आमदारांच्या मतदानावरून काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र पुढे आले आहे. काँग्रेसचे उमेदवार, सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याबाबत राष्ट्रवादीची मतदानविषयक भूमिका काय होती याविषयी पवार म्हणाले की, गुजरातची राज्यसभेची निवडणूक राजकीयदृष्टय़ा महत्त्वपूर्ण होती आणि अशा स्थितीत आमचे दोन्ही आमदार निर्णायक भूमिका घेणारे होते. एका आमदाराने पक्षादेश मानणार नसल्याचे सांगितले होते.