कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. या खटल्यासंदर्भात आता ९ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयावर समीरच्या वकिलांनी निकालाची प्रत हाती आल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे, तर पानसरे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाडने जामीन मिळावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता. समीरला पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी पानसरे हत्या प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर दिलेली न्यायालयीन कोठडी संपल्याने समीरने हा अर्ज केला होता, मात्र समीरला जामीन दिला तर तो पळून जाईल, अशी भीती सरकारी वकिलांनी व्यक्त केली होती.
या खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेल्या हर्षद निंबाळकर यांनी सोमवारी यावर युक्तिवाद मांडला होता. समीरकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि मोटारसायकल जप्त करायची आहे, शिवाय अन्य दोन साक्षीदार पुढे आले आहेत, त्यांचीही चौकशी करायची आहे असा युक्तिवाद मांडला होता. तर समीरचे वकील समीर पटवर्धन यांनी समीर विरोधात पोलिसांकडे गुन्हा सिद्ध होईल असे पुरावे नसल्याने त्याचा जामीन मंजूर करावा अशी मागणी केली होती.
त्यावर आज सुनावणी होणार होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. डी. बिले यांनी समीरचा जामीन अर्ज फेटाळत असल्याचे सांगितले. आरोपीचा स्वभाव, त्याच्या कृतीमागील भावना, या घटनेतील समाजाचा रस, प्रत्यक्ष पुरावा या बाबीचा न्यायालयाने विचार केला. रुद्र पाटील याच्याशी समीरचे असलेले संबंध, सनातनचे साधक व समीरचे मित्र ज्योती कांबळे, सुमित खामणकर, वीणा यांच्याकडून पुरावे फोडले जाण्याची शक्यता, समीरचे वकील पुनाळकर यांनी प्रत्यक्षदर्शीस उल्लेखून लिहिलेले पत्र, त्यावर त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा या मुद्दय़ांचा विचार करून जामीन अर्ज फेटाळला.