टोल, एव्हीएच कंपनी, खंडपीठ, करवाढ रद्द होण्यासंदर्भात विविध पक्षांतर्फे होणारी आंदोलने तसेच मालमोटार मालकांनी पुकारलेला बेमुदत संप आणि आगामी काळात होणाऱ्या विविध सणांच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अप्पर जिल्हादंडाधिकारी संगीता चौगुले यांनी ५ऑक्टोबर रोजी पहाटे पासून ते १९ ऑक्टोबर रोजीच्या रात्रीपर्यंत समूहबंदीचा आदेश जारी केला आहे.
कोल्हापूर शहरातील आय. आर. बी. कंपनीचे टोल संदर्भातील आंदोलन तसेच चंदगड तालुक्यतील हलकर्णी येथील ए. व्ही. एच. कंपनीस चंदगड गावातील नागरिकांचा व सर्व राजकीय पक्षांचा विरोध असून यापूर्वी मोठय़ा प्रमाणावर आंदोलने होऊन कंपनीचे व टोल नाक्यांचे नुकसान झालेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी आंदोलने होत आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १ ऑक्टोबरपासून लॉरी मालकांचा बेमुदत संप चालू आहे. शासनाने केलेली करवाढ रद्द होण्यासाठी ५ व ६ऑक्टोबर रोजी रोजी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करणार आहेत. तसेच १३ ऑक्टोबरपासून घटस्थापना व १५ ऑक्टोबर रोजी मोहरम उत्सव चालू होणार आहे. विविध पक्ष संघटनांच्या वतीने करण्यात येणारी आंदोलने व आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून समूहबंदीचा आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात शष्टद्धr(२२९ो, बंदुका, तलवारी, भाले, काठी किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा कोणत्याही वस्तू बरोबर नेणे, पाच अगर पाचाहून जादा व्यक्तींनी एकत्र जमा होणे, जमाव जमणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे आदींसाठी मनाई करण्यात आली आहे.