लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांना सूचक इशारा ; ग्रामीण भागातील राजकारण बदलण्याची चिन्हे; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या रणनीतीला यश

सहकाराची पाळेमुळे खोलवर रुजल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाया ग्रामीण भागात भक्कमपणे विस्तारल्याचे पश्चिम महाराष्ट्रात आजवर दिसत होते. पण ग्रामीण भागातील ही मूळे उखडून फेकून तेथे कमळ रुजविण्यात यंदा प्रथमच भाजपाने यश मिळवत राजकीय पंडितांचे आडाखेही धुळीस मिळवले. राज्याच्या सत्तास्थानी द्वितीय स्थानी असलेले महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कोल्हापूरसह सांगली व सोलापूर या जिल्’ाात भाजपाअंतर्गत समन्वय ठेवून आणि धुरंदर राजकीय खेळी करत काँग्रेस-राष्ट्रवादीला नेस्तनाबूत केले. स्थानिक स्वराज्य संस्थेतील हा विजय भाजपाचे ग्रामीण भागातील स्थान मजबूत बनविण्यास कारणीभूत तर ठरला आहेच. खेरीज, २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीही तो तारक ठरणार आहे. हीच बाब काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेची बनली आहे.

पश्चिम महाराष्ट्राची ओळख ही सहकारबहुल अशीच राहिली आहे. साखर कारखाने, सूत गिरण्या, दूध संस्था यांसारख्या विविध प्रकारच्या सहकारी संस्थांच्या जाळ्याच्या जोरावर काँग्रेस-राष्ट्रवादीने या भागातील ग्रामीण राजकारणावर आपली मांड ढळू दिली नव्हती. सहकारी संस्थाही उत्तम प्रकारे चालत असल्याने लोकांचा संस्था व नेत्यांवरही विश्वास होता. पण गेल्या दीड-दोन दशकात सहकार क्षेत्राला ओहोटी लागली आणि त्याचे राजकीय परिणामही दिसू लागले.

लोकसभा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्राला जबर हादरे बसले. केंद्रात व राज्यात भाजपा सत्तास्थानी पोहोचला. तथापि भाजपाची कामगिरी सुमार असल्याची टीका करत उभय काँग्रेसच्या नेतृत्वांनी आता भाजपाचे दिवस सरले, असा दावा करण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांनी पहिली चाचणी नगरपालिका निवडणुकांमध्ये केली. पण येथेही भाजपा व शिवसेनेने मुसंडी मारली. त्यानंतर नोटाबंदीचा विषय उपस्थित करत शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या भाजपाला जनता लाथाडून लावेल, असा दावा काँग्रेसजनांनी जिल्हा परिषद निवडणुकांत केला. पण तोही फोल ठरला. आणि ग्रामीण भागातही कमळ तरारुन उगवले.

मंत्र्यांची व्यूहरचना

’मात्र कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्’ाात काठावर बहुमत मिळविलेल्या भाजपाला मिनी मंत्रालय सर करणे सहजी शक्य नव्हते. सत्ता स्थापनेतील अडचणी लक्षात आल्यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी कोल्हापूर, सांगली व सोलापूर या तिन्ही जिल्हा परिषदामध्ये सत्ता आणण्याचा चंग बांधला. आणि त्या अनुषंगाने राजकीय व्यूहरचना गतिमान केली.

’सत्ता स्थापनेचे पुरेसे संख्याबळ हाती नसल्याने भाजपाने स्थानिक आघाडय़ांना जवळ करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याला पुरेसा प्रतिसाद नव्हता. पण ज्या ठिकाणी जी मात्रा लागू पडेल ती वापरण्याची युक्ती अंमलात आणण्याचे ठरविले आणि त्याचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. कोल्हापूर व सांगलीमध्ये विरोधात राहणाऱ्या शिवसेनेला रातोरात जवळ केले. काँग्रेसमधील नाराज माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा गट व निवडणुकीत संबंध ताणले गेलेले खासदार राजू शेट्टी यांनाही आपल्या छावणीत आणण्यात चंद्रकांत पाटील यांची खेळी यशस्वी ठरल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपाचे कमळ फुलले.

’सांगलीतही बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिले. रयत विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना यांना आपल्या सोबत घेण्यात भाजपाला यश आले. पण तेथे अंतर्गत गटबाजीचा मुद्दा अखेरच्या क्षणी उफाळला. अध्यक्षपद मिळण्याची शक्यता दुरावल्याने शिवाजी डोंगरे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असलेल्या डोंगरेंची अखेरच्या क्षणी समजूत काढण्यात आली आणि यामुळेच वसंतदादांच्या सांगली जिल्ह्यातही कमळ फुलले.

’सोलापूरात भाजपाचा थेट सामना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी व्हायचा होता. पण राष्ट्रवादीकडे बहुमत असतानाही पक्षांतर्गत धुसफूस व फाटाफुटीचा अचूक लाभ भाजपाने उठविला. नाराज असणाऱ्या प्रत्येक घटकाचे मन आपल्याकडे वळविण्याची चाणाक्ष खेळी भाजपाला फायदेशीर ठरली. यामुळे भाजपा पुरस्कृत महाआघाडीने येथे बाजी मारली. पक्षांतर्गत धुसफूस राष्ट्रवादीला इतकी महाग पडली की या निवडणुकीत न उतरण्याचा नामुष्कीजनक निर्णय त्यांना घ्यावा लागला. बलाढ्य काँग्रेस-राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेत सत्तेचा दुष्काळ प्रथमच पाहावा लागला.

नाराजांना वळवले

जिल्हा परिषदेत सत्ता संपादन करण्यासाठी पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी ज्या मार्गाचा-तंत्राचा वापर करीत होती. तेच तंत्र यावेळी भाजपाने अवलंबले. त्या आधारेच नाराज घटकांना आपल्याकडे वळवत काँग्रेस-राष्ट्रवादीचा डाव त्यांच्यावरच उलटविण्यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व सहकार मंत्री सुभाष देशमुख हे दोघेही यशस्वी ठरले आहेत. पश्चिम महाराष्ट्रासारख्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सुपीक पट्टय़ात अन्य पक्षाला स्थान मिळणार नाही असे म्हटले जायचे. पण हा सिद्धान्त खोटा ठरवत सातारावगळता कोल्हापूर, सांगली व सोलापूर या तिन्ही जिल्’ाातील मिनी मंत्रालयावर निशाण रोवण्यात भाजपाने बाजी मारली आहे. हे यश भाजपाला आगामी राजकारणात लाभदायक ठरणार असून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची राजकीय उंची वाढविणारेही ठरले आहे. जबर धक्का बसलेल्या उभय काँग्रेसला आता आणखीन एका चिंतन शिबिराची गरज आहे.