बी.कॉम. भाग एकमध्ये प्रवेशासाठी भाजपा विद्यार्थी आघाडीच्यावतीने इचलकरंजी येथे व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य बी. ए. खोत यांना कोंडून ठेवत ठिय्या आंदोलन करण्यात आले. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याशिवाय हलणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

जून महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. प्रवेश न मिळालेल्या ३० विद्यार्थ्यांनी भाजपा विद्यार्थी आघाडीशी संपर्क साधला होता. त्यानुसार आघाडीचे शिष्टमंडळ व्यंकटेश महाविद्यालयात आले. त्यांनी प्राचार्य खोत यांच्याशी संपर्क साधून प्रवेशाबद्दल मागणी केली. पण प्राचार्यानी प्रवेश देण्यास असमर्थतता दर्शविल्याने संतप्त आंदोलकांनी प्राचार्याच्या दालनाचे दार बंद करुन दारात ठिय्या मारुन घोषणाबाजी सुरु केली.

दरम्यान, ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष हरिष बोहरा यांनी आंदोलनात मध्यस्थी करुन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची ग्वाही दिली. तर अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या मान्यतेसाठी विद्यापीठाकडे स्वत प्रयत्न करु, असे आश्वासन विद्यार्थी आघाडीतर्फे देण्यात आले. आंदोलन संदर्भात आमदार सुरेश हाळवणकर यांनी तातडीने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन सादर केले. त्यावर मंत्री तावडे यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु देवानंद शिंदे यांना प्रवेश संदर्भात तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश दिले आहेत.