कर्नाटक शासनाचे नवे अन्यायसत्र

कर्नाटक सरकार विरोधात मराठी भाषिक सीमाभागात शांततेत काळा दिन पाळणे मराठी भाषकांना त्रासदायक ठरू लागले असून यामध्ये सहभागी झालेल्या मराठी युवकांवर गंभीर गुन्हे दाखल करुन अटक सत्र सुरु करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांना गुरुवारी कर्नाटक पोलिसांनी बेळगाव येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

कर्नाटक राज्याचा स्थापना दिन, १ नोव्हेंबर हा सीमाभागातील मराठी भाषक ‘काळा दिन’ म्हणून पाळतात. या दिवशी सीमावासीयांनी बेळगाव येथे सनदशीर मार्गाने सायकल फेरी काढली. हे सर्व आंदोलन लोकशाही मार्गाने झालेले असतानाही कर्नाटक पोलिसांनी यातील सहभागी मराठी भाषकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. शहापूर, एपीएमसी आणि मार्केट पोलिसांक डून दया मनोज योद्धळुरकर, राम बाबुराव पाटील, यशोधर महादेव पाटील, सचिन राम कदम आणि महेश पाटील या पाच तरुणांवर सार्वजनिक ठिकाणी दंगल करणे, दोन भाषांत तेढ निर्माण करणे, शाांतता भंग करणे आदी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, निषेध फेरीत घोड्यावर बसून खेळण्यातील बंदूक घेणाऱ्या रत्नासाद पवार याच्यावर या सर्व गुन्ह्य़ांसह विनापरवाना शस्त्र वापरल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यालाही गुरुवारी न्यायालयात हजर केले असता पवार याला न्यायालयीन कोठडी सुनावणाात आली. त्याची रवानगी हिडलगा कारागृहात करण्यात आली. दरम्यान, या सर्व घटनांच्या पाश्र्वभूमीवर मराठी भाषकांची आज इथे बैठक झाली. या बैठकीस बेळगावचे महापौर, उपमहापौर यांच्यासह आमदार संभाजी पाटील, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये या अन्यायाबाबत कायदेशीर लढाई लढण्याचे ठरविण्यात आले.

दरम्यान त्यांची ही बैठक संपताच या सर्व मराठी भाषकांच्या घरांभोवती पोलिस बंदोबस्ताच्या नावाखाली त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास कर्नाटक सरकारने सुरू केले आहे. कर्नाटक सरकारच्या या कारवायांमुळे सीमाभागातील मराठी भाषकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.