बांधकाम मंजुरीबाबत शासनाचे धोरण व कार्यपद्धतीबाबत बांधकाम व्यावसायिकांच्या विविध मागण्यांबाबत येथील बांधकाम व्यावसायिकांनी मंगळवारी कडकडीत बंद पाळला. बांधकाम व्यावसायिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. देशव्यापी बंदअंतर्गत करण्यात आलेल्या आंदोलनात येथील बांधकाम व्यावसायिक व्यवहार बंद ठेवून सहभागी झाले होते. या वेळी मागण्यांचे निवेदन आयुक्त पी. शिवशंकर तसेच जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांना दिले.
बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेच्या परवान्यांबाबत येणाऱ्या विविध त्रुटींचे निराकरण करण्यासाठी निवडणुकीनंतर बांधकाम व्यावसायिकांची बठक घेऊन समन्वय समिती स्थापन करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना दिले. बांधकाम व्यवसायाबाबतचे धोरण आजही अनेक ठिकाणी जाचक ठरत आहे. शासनाच्या या चुकीच्या धोरणाला व कार्यपद्धतीला कंटाळून क्रिडाई ठाणेचे अध्यक्ष सूरज परमार यांनी आत्महत्मा केली. मृत्यूपूर्वी त्यांनी दिलेल्या चिठ्ठीत शासनाचे धोरण चुकीच्या पद्धतीने नाकारण्यात येणारे परवाने, त्यात होणारा राजकीय हस्तक्षेप आणि त्यामुळे होणारा दुष्परिणाम याचा उल्लेख केला आहे. सर्वच ठिकाणी अशा पद्धतीने बांधकाम व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याचा निषेध क्रिडाईच्या वतीने देशव्यापी कामबंद आंदोलन पुकारले. याला कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांनी कडकडीत बंद ठेवून पािठबा दिला. तसेच कोल्हापुरातील व्यावसायिकांनी पांढरा शर्ट, काळी पँट, तसेच काळी फीत लावून आपला निषेध नोंदविला.
या वेळी क्रिडाईचे महेश यादव, गिरीश रायबागे, सुजय होसमणी, विद्यानंद बेडेकर यांच्यासह बांधकाम व्यावसायिक आंदोलनात सहभागी झाले होते.