पुणे-बंगळूर महामार्गावर शिये फाटा येथे पाच वाहने एकमेकांवर आदळून रविवारी सकाळी अकराच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात अलिशान गाडय़ांचे  लाखो रुपयांचे नुकसान झाले, तर एवढा मोठा अपघात होऊन कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिक माहिती अशी, वाठारकडून बंगळूरकडे जाणाऱ्या डंपरने  (एमएच -झेड -२६९०)कर्नाटकात चाललेल्या मोटारीला  (केए  -२५-६१४१) पाठीमागून धडक दिली, त्यानंतर डंपरने पुन्हा दुसऱ्या मोटारीला (टोयोटा अल्टीस, एमएच-जीएफ -१२  – ४२९७) पुन्हा धडक दिली.

टोयोटा अल्टीस शिये फाटा येथे थांबलेल्या केएमटी बसखाली जाऊन घुसली.  या कारला करोला गाडी पाठीमागून भरधाव वेगाने येऊन धडकली.  अपघातात फक्त वाहनांचे लाखांचे नुकसान झाले आहे.

कोणीही जखमी नाहीत. या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.