समाजात काही चुकीचे घडू लागले, तर त्यासाठी शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरले जाते. त्यामुळे योग्य शिक्षण देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. कुलगुरू हे केवळ विद्यापीठाचेच प्रमुख असतात, असे नव्हे; तर, त्यांच्या उच्च विद्याविभूषिततेमुळे समाजाचे दिग्दर्शन करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे, असे प्रतिपादन भारतीय विश्वविद्यालय संघाचे (ए.आय.यू.) सरचिटणीस प्रा. फुरकान कमर यांनी शुक्रवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या दोन दिवसीय पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
परिषदेतील चर्चासत्रांत कुलगुरूंचा सहभाग उत्साहवर्धक होता आणि त्यांमध्ये अत्यंत उच्च दर्जाची चर्चा झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून प्रा. कमर म्हणाले,  आपले विद्यापीठ, आपली महाविद्यालये यांच्या पलिकडे जाऊन आपल्यावरील व्यापक सामाजिक जबाबदा-या निभावण्यात आपण सर्वाच्या पुढे असले पाहिजे. देशाच्या विकासाला धोरणात्मक मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उच्चशिक्षण क्षेत्रावरच आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, भविष्यात ए.आय.यू. ने ‘स्मार्ट युनिव्हर्सटिी’ या विषयावर परिषद आयोजित करावी. कारण विद्यापीठे स्मार्ट झाली, तरच त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीसारख्या योजना यशस्वी होण्यास चालना मिळेल.
विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक तथा परिषदेचे नोडल ऑफिसर डॉ. डी.आर. मोरे यांनी दोन दिवसीय परिषदेतील चर्चासत्रांचा आढावा घेऊन अहवाल वाचन केले. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते सदर अहवाल प्रा. कमर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी जयपूरच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. एस.एम. सोनी आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.एच. पवार यांनी या परिषदेत झालेल्या चर्चासत्रांबद्दल प्रातिनिधिक प्रतिक्रिया नोंदविल्या. प्रा. आर.के. कामत यांनी सूत्रसंचालन केले.