राजू शेट्टी यांचा ‘रालोआ’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना आणखी एक मंत्रिपद देण्यात येईल, असे विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे बोलताना केले. मात्र हे करताना त्यांनी सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपद काढून घेण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेट्टी-खोत यांच्यातील वाद चांगलाच चिघळत चालला आहे. खोत यांची संघटनेतून हकालपट्टी करून न थांबता शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खोत आणि स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचा संबंध तुटला असल्याचे सांगून टाकले. खोत हे स्वाभिमानीचे प्रतिनिधी नसल्याने त्यांच्या हकालपट्टीची भूमिका शेट्टी यांनी घेतली. सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढवत शेट्टी यांनी ‘रालोआ’तून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शेट्टी-खोत यांच्या वादातून सरकारला अडचण होऊ नये अशी भूमिका भाजप घेत आहे. या पाश्र्वभूमीवरच चंद्रकांत पाटील यांनी ‘स्वाभिमाना’ला आणखी एक मंत्रिपद देण्याचे विधान केले आहे.

राणेंचे भाजपात स्वागतच

माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पुत्रासह भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत, याकडे लक्ष वेधले असता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे भाजपमध्ये येत असतील, तर स्वागतच असल्याचे सांगत पक्ष त्यांच्या हाती कमळ देण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे पण अजून त्याची निश्चिती झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले.