भाजप शिवसेनेची युती अभेद्य आहे, त्यामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाडव्याचे निमंत्रण घेऊन जाण्याचा मुद्दाच निर्माण होत नाही, असे म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाडवा निमंत्रणाच्या चर्चेला रविवारी बोलताना पूर्णविराम दिला.

भाजप व शिवसेना या सत्ताधारी पक्षातील संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणलेले आहेत, मैत्रीमध्ये दरी निर्माण झाल्याने सरकारच्या अस्थिरतेवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे, या पाश्र्वभूमीवर सत्तेतील दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये सुसंवाद राहावा यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे दोन ज्येष्ठ मंत्री गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांना भेटून पाडवा निमंत्रण देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, मात्र सरकार मजबूत असल्याचे सुचित करीत पाटील यांनी या चर्चेतील हवा काढून घेतली.

भाजपामध्ये मोठय़ा संख्येने आमदारांचे प्रवेश होणार असल्याकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, सरकारचे संख्याबळ दोनशेपर्यंत भक्कम असल्याने आमदार फोडण्यात आम्हाला कसलाही रस नाही. आमदार फोडून काँग्रेस राष्ट्रवादीला शह देण्याचाही प्रयत्न नाही. जे भाजपामध्ये स्वेच्छेने प्रवेश करणार आहेत, त्यांचे स्वागत केले जाईल. राज्यातील निवडणुका अद्याप लांब आहेत, त्या जेव्हा सहा महिन्यांपर्यंत येतील, तेव्हा कोणत्या पक्षात प्रवेश करायचे हे संबंधित आमदारच ठरवतील असे म्हणत तुर्तास तरी भाजपाकडून आमदार फोडले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राणे हवेहवेसे व्यक्तिमत्त्व

नारायण राणे हे सर्वाना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व आहे, ते भाजपप्रमाणे शिवसेनेतही प्रवेश करणार अशी चर्चा आहे. राणे असोत की माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रवेशाबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.