कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्यानंतर महापालिका प्रशासन, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सायंकाळी तातडीची बठक होऊन त्यामध्ये ७ विभागीय कार्यालयांमार्फत निवडणूक प्रक्रिया बिनचूकपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी मध्यरात्रीपासून सुरु होणार असून त्यानंतर लगेचच महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांची वाहने ताब्यात घेतली जाणार आहेत. मंगळवारपासून महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक यांना कोणालाही आदेश न देता सामान्यांप्रमाणे वागावे लागणार आहे.
कोल्हापूर महापालिकेसाठी ८१ प्रभागांमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम घेतला जात आहे. गेल्या आठवडाभरापासून आचारसंहिता कधीपासून सुरु होते याची चर्चा सुरु होती. गणेश विसर्जन झाल्यानंतर आचारसंहितेचा अंमल सुरु होईल असा अंदाज वर्तविला गेला होता. तो आज प्रत्यक्षात उतरल्याचे दिसून आले.
महापालिकेसाठी १ नोव्हेंबरला मतदान होणार असून २ नोव्हेंबरला मत मोजणी होणार आहे. तत्पूर्वी ६ ते १३ ऑक्टोंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत. १४ ऑक्टोंबर रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया होईल. १६ ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून १७ ऑक्टोबरला मतदान केंद्र व केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत.
महापालिका निवडणुकीची राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा झाल्यानंतर त्याचे पडसाद महापालिकेमध्ये दिसून आले. प्रभाग रचना, मतदार यादी यामध्ये महापालिका प्रशासनाचा गलथानपणा दिसून आला होता. त्यामुळे किमान निवडणूक होईपर्यंत तरी कसल्याही चुका न करता निवडणूक प्रक्रिया पार पडली जावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आयुक्त पी.शिवशंकर यांनी सायंकाळी तातडीने महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बठक घेतली. महापालिकेची निवडणूक प्रकिया ७ विभागीय कार्यालयामार्फत राबविली जाणार आहे. त्यानुसार संबंधित विभागीय कार्यालयातून कामकाज अचूकपणे हाताळण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्याना दिल्या आहेत.
दरम्यान, राजकीय पक्षांमध्येही हालचालींना गती आली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पाठोपाठ आता काँग्रेस, शिवसेनेसह अन्य पक्षांनीही उमेदवारांची घोषणा करण्यासाठी कंबर कसली आहे. या आठवडय़ात सर्व पक्षांच्या उमेदवारांची घोषणा होईल, असे चित्र आहे.