इचलकरंजी नगरपालिकेची सभा काल वादाने गाजल्यानंतर बुधवारी पालिका प्राथमिक शिक्षण मंडळाची सभाही गोंधळातच प्राथमिक शिक्षण मंडळाची पार पडली. अधिकाराचा गरवापर करीत सभेची वेळ बदलल्याने काँग्रेस सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. सभेतील विविध विषयांवरून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या.
प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना केलेल्या विविध शैक्षणिक साहित्य वाटपाचे बिल अदा करणे, गणवेश पुरविणेबाबतची निविदा रद्द करणे, त्याचबरोबर विद्यानिकेतनमध्ये चालू शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता आठवीचा वर्ग सुरू करणे अशा विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी प्रभारी सभापती नितीन कोकणे यांनी बुधवारी शिक्षण मंडळाची सभा बोलविली होती. मात्र विषयपत्रिकेवरील विषयांपेक्षा एकमेकांवरील आरोपामुळे या सभेत गोंधळ निर्माण झाला.
सभेच्या प्रारंभी माजी सभापती दत्तात्रय कित्तुरे यांनी सभेची वेळ का बदलली याचा खुलासा करावा असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर कोकणे यांनी प्रशासन अधिकारी चंद्रकांत काळे यांची चंद्रपूर येथे बदली झाली असून त्यांना तिकडचा पदभार स्वीकारण्यास जाणे गरजेचे असल्याने ११ वाजता ही सभा बोलविण्यात आली आहे. तसे शुद्धिपत्रकही सर्वाना पाठविला असल्याचा खुलासा केला. मात्र त्यावर काँग्रेस सदस्यांचे समाधान न झाले नाही. त्यांनी एक महिन्यापूर्वी पत्र आले असताना अचानकपणे सभा बोलावून, वेळेत बदल करण्यामागे नेमके कारण काय असा सवाल केला. त्यावरून दोन्ही बाजूकडील सदस्य उठून बोलू लागल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला.
या गोंधळातच कोकणे यांनी विषयपत्रिकेचे वाचन सुरू केले आणि सत्तारूढ सदस्यांनी बहुमताने सर्व विषयांना मंजुरी देत सभा संपल्याचे जाहीर केले.
सभेनंतर कोकणे म्हणाले, एकिकडे शिक्षण मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगत दुसरीकडे विषयांना विरोध दर्शवत काँग्रेस काय साधत आहे असा सवाल केला. आमच्यावर आरोप करण्यापूर्वी त्यांनी साडेचार वर्षांत काय विकास केला याचा खुलासा करावा.
कित्तुरे यांनी प्रशासन अधिकाऱ्यांना हाताशी धरून धनादेश काढून ढपला पाडण्यासाठी हा सर्व खटाटोप सत्तारूढ गटाने केल्याचा आरोप केला. शैक्षणिक साहित्याच्या केवळ निविदा काढून त्याची कोणतीही शहानिशा न करता अथवा दर्जा न तपासता बोगसगिरी केली गेली. चुकीच्या पद्धतीने टेंडर काढून केवळ टक्केवारी घेण्याचे काम त्यांनी नीटपणे केल्याचा सणसणीत टोला लगावला.