‘बोलावणं आल्याशिवाय नाही’ असा हटवादी पवित्रा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतल्याने संभाव्य आघाडीच्या चच्रेचे घोडे अडले आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी चर्चा करण्यास अद्याप पुष्कळ अवधी असल्याचे सांगत संयमी भूमिका ठेवली आहे. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, आमदार हसन मुश्रीफ यांनी थोरल्या भावाचे निमंत्रण आल्याशिवाय जाणार कसे, असे म्हणत चेंडू काँग्रेसकडे टोलवला आहे. काँग्रेसने स्वाभिमानीशी हातमिळवणी करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. याच वेळी राष्ट्रवादीतील एका गटाला काँग्रेस सोडून अन्य पक्ष चालतील अशी भूमिका घेतली आहे. या घडामोडी पाहता जिल्हा परिषद निवडणुकीचे जागावाटपाचे भिजत घोंगडे कायम आहे.

राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही काँग्रेससोबत एकत्रित निवडणूक लढवण्याचा विचार बोलून दाखवला आहे. मात्र, उभय काँग्रेसच्या नेत्यांची ही भूमिका जिल्हापातळीवर किती पोहोचली हा शोधाचा मुद्दा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका पाहता याबाबत सध्यातरी आनंदीआनंद असल्याचे दिसते.

लगतच्या सांगली जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष मोहनराव कदम यांनी आघाडीच्या चच्रेची वेळ संपली, असे म्हणत आघाडी धोरणाला कोलदांडा घातला आहे. पण, याच वेळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी जिल्हाध्यक्षांना आघाडीचे अधिकार असल्याचे स्पष्ट करत याची चर्चा करण्यास महिनाअखेपर्यंत वेळ असल्याचे सांगत संयमी भूमिका ठेवली आहे. मुश्रीफ हे व्यक्तिगत काँग्रेसशी जमवून घेण्याच्या मानसिकतेत आहे. त्याची अडचण आहे ती चच्रेसाठी पुढाकार कोणी घ्यायचा याची.  थोरल्या भावाने निरोप धाडला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याच वेळी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याशी असलेल्या राजकीय वैराची जाणीव ठेवत पाटील यांच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात चुलत बंधू, भाजप आमदार अमल महाडिक यांच्यासमवेत निवडणूक लढवण्याची उघड भूमिका घेतली आहे. यामुळे यासह अन्य काही तालुक्यांत आताच आघाडीचे तीन तेरा झाले आहेत.