जिल्ह्यतील काँग्रेस नेत्यांनी केवळ व्यक्तिद्वेषातून आवाडेंचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत पक्षालाच नेस्तनाबूत केले. अशा स्वार्थी राजकारण्यांना धडा शिकवण्याची भाषा करत माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे व माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले. पक्षाला सुबुध्दी सुचेपर्यंत कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीचाच झेंडा खांद्यावर घेऊन पक्षविरहीत राजकारण करण्याचा पवित्रा घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासमवेत हातकणंगले व शिरोळ तालुक्यात राजकारण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद निवडणुकीत डावलले गेल्याने आवाडे गटाने ही निवडणूक कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून लढवली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेत राहुल आवाडे यांच्यासह दोन तर पंचायत समितीचे पाच सदस्य निवडून आले. या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा व कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही आवाडे समर्थक या बॅनरखाली पार पडला. त्याप्रसंगी आवाडे कुटुंबातील तिन्ही पिढय़ांनी राजकारणाची बदलती दिशा कशी असेल यावर भाष्य केले.

प्रकाश आवाडे म्हणाले,  इचलकरंजीसह वडगांव आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले जाणार असून त्यामध्ये आघाडीची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे. जिल्हा परिषद हे त्यासाठी माध्यम आहे.

जिल्ह्यतील नेतृत्वाला हातकणंगले व शिरोळबद्दल द्वेष आहे, असा उल्लेख करून  कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले,  सातत्याने आवाडेंना लक्ष्य करुन बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.  ज्यांना आम्ही उभारी दिली तेच आता उलटत आहेत. आवाडेंना संपविण्याची भाषा करणारे आज स्वत:चे अस्तित्व शोधत फिरत आहेत. ज्यांनी विरोध केला त्यांना धडा शिकवा, त्यासाठी कार्यकर्त्यांना मोकळीक आहे. जशास तसे हेच धोरण अवलंबून ‘काँग्रेस अंतर्गत आवाडे गट’ म्हणून कार्यरत राहील असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेत अडचण

कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्याच्या हालचाली सुरू असताना आवाडे यांच्या जिल्हा ताराराणी विकास आघाडीची दोन मते बाजूला वा तटस्थ राहण्याची शक्यता बळावल्याने काँग्रेसच्या प्रयत्नात अडचण निर्माण झाली आहे.

माने – आवळे लक्ष्य

मेळाव्यात राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने व काँग्रेसचे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्यावर सडकून टीका करताना ज्यांनी    आम्हाला विरोध केला त्यांना त्यांची जागा या निवडणुकीत दाखवून दिली असून हीच भूमिका या पुढेही कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट करत आगामी राजकारणाची दिशा  दर्शवली.