नोकरदारांचे वेतन आणि बोनस वेळेत मिळाल्याने या वर्षी दिवाळीपूर्वी नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळी खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची लगबग सुरू आहे. यात कापड,पणत्या, मिठाई, आकाशकंदील, फराळाच्या साहित्याचा समावेश आहे. एकूण दरात ३० ते ३५ वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
ग्राहकांच्या खरेदीचा कल ब्रँडेड कपडय़ांकडे आहे. ऑनलाईनचा जमाना असल्याने अनेकांनी केलेली खरेदी लाखो रुपयांवर गेली आहे. कॅमेरा, मोबाईल, होम अपालायंसेस, किचन अपलायंसेस ऑनलाईन खरेदीवर जोर आहे. पणत्या, मेणबत्त्या, आकाश कंदी, फटाके, किल्ले, खेळणी याकडे बालचमूंचा ओढा दिसून येतो आहे. यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसचे मोठे किल्ले ही बाजारात दोन ते अडीच हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. सोने, चांदीच्या दागिन्यांच्या दुकानातही सोन्याचे दर उतरल्याने गर्दी आहे.
व्यापारी सहकारी पतसंस्थेने ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारा लाडू-चिवडा महोत्सव सुरू झाला असून हा महोत्सव सलग अकराव्या वर्षीही दिमाखात सुरू आहे. येथे नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून कच्च्या मालाच्या दरात २५ टक्याहून अधिक वाढ झाली असली तरी लाडू व चिवडय़ाच्या दरात वाढ केली नसल्याचे संयोजकांनी सांगितले.