गुन्ह्यतील तडजोडीसाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलिस नाईक संजय गोिवद जाधव (वय ४३ रा. फुलेवाडी) यास विशेष न्यायाधीश के. डी. बोचे यांनी दोषी ठरवत एक वष्रे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी  सुनावली.

सरकारी वकील म्हणून दिलीप मंगसुळे यांनी काम पाहिले. याबाबतची फिर्याद विनायक लहू भाट (वय ४०, रा. वय ४०, मुंबई) यांनी लाचलुचपत खात्याकडे दिली होती.

संजय जाधव यांच्या बहिणीचे पती शामराव रामचंद्र जगताप यांचे सडोली खालसा (ता. करवीर) येथे केशकर्तनाचे दुकान आहे. शेजारीच विनायक भाट यांचे घर आहे. जगताप व भाट यांच्यात हद्दीवरून वाद झाला असता भाट यांनी जगताप यांच्या डोक्यात फावडे घालून गंभीर जखमी केले होते. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या वेळी संजय जाधव करवीर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून सेवा बजावत होता.

या गुन्ह्याचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होऊ नये, तडजोड व्हावी या दृष्टीने भाट हे जाधवला भेटले. सर्व प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाखांची मागणी जाधवने भाट यांच्याकडे मागितली. एक लाख रुपये लाच देण्याचे भाट यांनी कबूल केले. ९ ऑक्टोबर २०१४ रोजी सापळा रचून तावडे हॉटेल नजीक जाधवला अटक केली होती.

जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे यांनी सहा साक्षीदार तपासले. फिर्यादी लहू भाट, पंच रुपेश साळुंखे, तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, तपासी अंमलदार दामाजी सावंत, उदय आफळे यांनी दिलेला जबाब व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून एक वर्ष सक्तमजुरी शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड न भरल्यास पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.