जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन विनापरवानगी रॅली काढल्याप्रकरणी महापौर, उपमहापौर, स्थायी सभापतींसह १०० जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबतची फिर्याद सुनील आमते यांनी दिली.

महापौर आश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, परिवहन सभापती लाला भोसले, नगरसेवक हसीना फरा, शेखर कुसाळे, सत्यजित कदम (नाना), राजाराम गायकवाड, नियाज खान, अजिंक्य चव्हाण, राहुल माने, प्रतापसिंह जाधव, इंद्रजित बोंद्रे, तौफीक मुल्लाणी, दिलीप पवार, कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती निमंत्रक आर. के. पवार, ऋतुराज क्षीरसागर, दिलीप देसाई, सुरेश जरग, प्रल्हाद चव्हाण, नामदेव गावडे, तुषार देसाई, राजेश लाटकर, बाबा पार्टे, आदिल फरास, चंद्रशेखर कांबळे, विजय करजगार, प्रसाद जाधव, सतिशचंद्र कांबळे, महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, दुर्वास कदम, अनिल कदम, निरंजन कदम, गजानन भुर्के, जयवंत हारुगले, रणजीत जाधव, रणजीत पोवार, लाला गायकवाड यांच्यासह १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, हद्दवाढीस विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी गुरुवारी सर्वपक्षीयांच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय नेते शिवाजी चौक येथे जमले होते. यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर बंदचे आवाहन करत मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्ह्य़ात २१ जुल ते ४ ऑगस्ट दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रक़रणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मध्यवर्ती बस स्थानक परिसरात कोल्हापूर-इचलकरंजी एसटीवर दगडफेक केल्याप्रकरणी सतिशचंद्र कांबळे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद सुनील विष्णू जाधव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.