कराडमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. तर, शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेताना, दर्जेदार कामाची अपेक्षा व्यक्त करीत काही सूचना चव्हाण यांनी केल्या.
कराड नगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या यशवंत विकास आघाडीच्या कार्यालयास दीपावलीनिमित्त चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी आघाडीचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्त्यांशी शहराच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. आमदार आनंदराव पाटील, नगरसेविका संगीता देसाई, विजय यादव, इंद्रजित चव्हाण यांच्यासह नगरसेवक  व कार्यकर्त्यांंची उपस्थिती होती.
राजेंद्र यादव यांनी यावेळी झालेल्या चर्चेत शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाल्याची माहिती दिली. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निधीतून सुरू असलेला यशवंतराव चव्हाण समाधी परिसर विकास, यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन विकास, बॅडमिंटन हॉल, जलतरण तलाव, स्वागत कमान, मल्टीपर्पज हॉल या कामांचा आढावा घेऊन सूचना केल्या. चोवीस तास पाणी योजनेच्या कामाबाबतही यादव यांनी माहिती दिली. पाण्याच्या मीटरबाबत नागरिकांवर बोजा पडणार नाही, यासाठी शासनाने सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक घेण्याचे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले.