प्रदेश पातळीवर कार्यरत असताना तालुका समितीवर वर्णी लावली म्हणून भाजपाचे नेते दीपक िशदे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विविध शासकीय समितीवर भाजपा कार्यकर्त्यांची वर्णी लावत असताना त्यांचे अवमूल्यन करण्याच्या प्रयत्नामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये पक्षनेतृत्वाबाबत असंतोष पसरला आहे.
दीपक िशदे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जातात. एक वेळ त्यांनी लोकसभेची निवडणूकही भाजपाच्या उमेदवारीवर लढली होती. राज्य स्तरावर त्यांच्या अभ्यासाचा पक्षांकडून नेहमीच मागोवा घेतला जातो. असे असताना मिरज तालुका ग्रामीण संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड त्यांना कोणतीही कल्पना न देता लावण्यात आली. तसे जाहीरही करण्यात आले.
यामुळे त्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी बेळंकी येथील कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. या नाराजी नाटय़ामुळे भाजपामध्येही सत्ता मिळताच नवीन आणि निष्ठावंत असा वाद निर्माण झाला आहे.
भाजपाने सत्ता हाती घेऊन एक वर्षांचा कालावधी पूर्ण केला. मात्र अद्याप जिल्हा नियोजन समितीमधील निमंत्रित सदस्यांची नावे निश्चित केलेली नाहीत. या नावाची यादी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयाकडे धाडली आहेत. मात्र या समितीत घटक पक्षांना किती जागा द्यायच्या आणि पक्षातील निष्ठावंतांना किती जागा द्यायच्या याचा निर्णय झालेला नसल्याने ही यादी रखडली आहे.