सहा जिल्ह्य़ांतील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

केवळ कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन करावे असा मंत्रिमंडळाचा नव्याने ठराव द्यावा अशी मागणी बुधवारी सहा जिल्ह्यांतील तीसहून अधिक आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कोल्हापूर खंडपीठ प्रश्नी पुढील आठवडय़ात सहा जिल्ह्यांतील आमदार, खंडपीठ कृती समिती यांची बठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या शिष्ठमंडळास दिले.

आज नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सहा जिल्ह्यांतील आमदारांनी कोल्हापूर खंडपीठ प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रश्नावर सुमारे अर्धा तास मुख्यमंत्री व आमदारांच्या शिष्ठमंडळामध्ये चर्चा झाली. सहा जिल्ह्यांतील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रित मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने कोल्हापूर खंडपीठ आंदोलनास धार येऊ लागली आहे.

आमदार सतेज पाटील यांनी खंडपीठप्रश्नी सहा जिल्ह्यांतील आमदारांना एकत्रित घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे शनिवारी कोल्हापूर येथे जाहीर केले होते. यानुसार बुधवारी कृषी मंत्री सदाभाऊ खोत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन होणे हे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांसाठी गरजेचे असल्याचे मत भेटलेल्या आमदारांनी व्यक्त केले.

यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर खंडपीठासाठी शासनाने मंत्रिमंडळाचा ठराव केला आहे. यासाठी ११०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे सांगितले. यावर आमदार नरके यांनी फडणवीस यांना मध्येच थांबवत मंत्रिमंडळाच्या ठरावामध्ये पुण्याचा उल्लेख असल्याने खंडपीठ स्थापनेस अडचण येत असून मंत्रिमंडळाचा केवळ कोल्हापूरसाठी खंडपीठ असा नव्याने ठराव करून द्यावा अशी मागणी केली.

तीसहून अधिक आमदार सक्रिय

खंडपीठासाठी प्रथमच मोठय़ा प्रमाणात सर्वपक्षीय आमदार सक्रिय झाले. फडणवीस यांना भेटलेल्यात पतंगराव कदम, सुमनताई पाटील, धनंजय गाडगीळ, जयंत पाटील, अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, प्रकाश आबीटकर, अनिल बाबर, शिवाजीराव नाईक, शंभुराज देसाई, बाळासाहेब पाटील, शशिकांत िशदे, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, भारत भालके, हणमंत डोळस, दिलीप सोपल, बबनराव िशदे, राजन साळवी, वैभव नाईक, नितेश राणे,आनंदराव नाईक या आमदारांचा समावेश होता .

विधिमंडळाबाहेर निदर्शने

कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन करण्यात यावे या मागणीसाठी सतेज पाटील, प्रकाश आबीटकर यांच्यासह सहा जिल्ह्यांतील आमदारांनी विधी मंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. कोल्हापूर येथे खंडपीठ झाले पाहिजे.. खंडपीठ आमच्या हक्काचे.. सहा जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळालाच पाहिजे,  अशा घोषणांनी विधी मंडळाचा परिसर दणाणून सोडला.