तीन महिन्यांच्या आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हातकणंगले तालुक्याचा दुसरा दौरा होत आहे . गुरुवारी त्यांची हातकणंगलेजवळील कोरोची गावात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा होणार आहे. भाजपच्या प्रचाराची ही पहिली तारांकित सभा असून सभेवेळी काहीजण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते.

तीन महिन्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास प्रत्येक महिन्याला कोल्हापूरला भेट दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात ते इचलकरंजी येथे नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी आले होते. शिरोळ येथील पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनानिमित्त डिसेंबर अखेरीस ते कोल्हापूर जिल्हाच्या दौऱ्यावर आले होते. तर, आता ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा घेण्यासाठी हातकणंगले जवळील कोरोची गावात येत आहेत. ही सभा दुपारी ३ वाजता होणार असल्याचे सांगण्यात आले होते पण दौऱ्याच्या पूर्वसंध्येला सभा दुपारी बारा वाजता होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सभेला जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत.

प्रसिद्धीला बगल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने भाजपची पहिली जंगी सभा होत असताना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या दौऱ्याच्या प्रसिद्धीपासून बाजूला राहणे पसंत केले आहे. एरवी, पक्षाच्या एखाद्या आघाडीचा नेता आला तरी त्याची सविस्तर माहिती दिली जाते. पण, मुख्यमंत्री जिल्ह्य़ात  येत असताना पत्रकार परिषद राहिली दूर साधे प्रसिद्धिपत्रक काढण्याची तसदी स्थानिक नेत्यांनी घेतली नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे राज्यभर प्रचारात गुंतले असताना स्थानिक नेत्यांना जबाबदारीचे भान राहिले नाही का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे.

यंत्रमागधारक गाजर उधळणार

यंत्रमाग व्यवसाय मंदीसह अन्य अडचणींनी ग्रासला आहे. इचलकरंजीतील सभेवेळी मुख्यमंत्र्यांनी हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ‘कारखानदारी लढा जगण्याचा’ या यंत्रमागधारक संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेवेळी गाजर उधळण्याचा निर्णय घेतला आहे.