‘जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता’ असे म्हणत काíतकी यात्रेसाठी आलेले भाविक आता परतू लागले आहेत. एस टी, रेल्वे आणि खासगी बस मधून भाविक आपआपल्या गावी परतू लागले आहेत. काíतकी यात्रेत एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहतुकीतही वाढ झाल्याचे येथील आगर प्रमुख व्ही. के. हिप्परगावकर यांनी सांगितले.
काíतकी यात्रेसाठी आलेला भाविक सोमवारी म्हणजे द्वादशीला सकाळपासून परतू लागला. दर वर्षी न चुकता येणार भाविक मोठय़ा श्रद्धेने पंढरपूरच्या वारीला येत असतो. एकादशीला चंद्रभागा स्नान, प्रदक्षिणा आणि विठ्ठलाचे दर्शन झाले की वारी पोचली आशी भावना वारकऱ्यांची आहे. चातुर्मासात थांबणारे भाविक पौर्णिमेचा काला झाला की जातात.
काíतकी यात्रेसाठी एस टी महामंडळाने राज्यातून जवळपास १४०० जादा गाडय़ांचे नियोजन केले होते. या मध्ये प्रामुख्याने कोकणातून जादा गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकादशीपर्यंत जवळपास १ लाख ३८ हजार प्रवाशी आले होते. गेल्या वर्षी १ लाख २८ हजार प्रवासी आले होते. तर गेल्या वर्षी १ कोटी ६३ लाख उत्पन्न मिळाले होते. यंदाच्या वर्षी यात वाढ होऊन २ कोटी ७ लाख ३८ हजार इतके उत्पन्न एकादशीपर्यंत मिळाल्याची माहिती आगार प्रमुख व्ही.के हिप्परगावकर यांनी दिली.
पंढरीत आलेले भाविक आता परतू लागले आहेत. यात्रेनंतर स्वच्छता आणि रोगराई पसरू नये म्हणून प्रशानाला आता विशेष मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. पौर्णिमेला गोपाळपूर येथे काला झाल्यावर येथील चार महिने वास्तव्यास असलेली महाराज मंडळी आळंदीच्या संजीवन सोहळ्यासाठी जाण्यास येथून प्रस्थान ठेवतात. असे असले तरी ‘हेचि दान देवा तुझा विसर न व्हावा’, अशी आर्त विनवणी करत भाविक परतू लागलाय.