कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात किरणोत्सव सोहळा कालावधीत भाविकांची निराशा झाली असली, तरी बुधवारी करण्यात आलेल्या प्रायोगिक किरणगती पाहणीत मात्र अभ्यासकांचे समाधान झाले. किरणोत्सव होण्यासाठी अपेक्षित परिमाणाच्या अगदी जवळपास किरणे पोहचली होती, असे  किरणोत्सव अभ्यासक प्रा. डॉ. मििलद करंजकर यांनी बुधवारी सांगितले.
अंबाबाई मंदिरात वर्षांतून दोन वेळा किरणोत्सव होतो. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी आणि ८ ते १० नोव्हेंबर या कालावधीत किरणोत्सव होतो. पहिल्या दिवशी सूर्य किरणांनी चरणस्पर्श केला होता. तर दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव झाला नव्हता. सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी सूर्यकिरणांनी श्री अंबाबाईचा चरणस्पर्श केला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मार्गातील अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होऊ शकला नसल्याने भाविकांत नाराजी होती.
तीन दिवस किरणोत्सव असला तरी आज प्रायोगिक पाहणी करण्यात आली. विवेकानंद कॉलेजचे अभ्यासक विध्यार्थी तसेच प्रा. करंजकर यांनी सायंकाळी पाहणी केली असता तीन दिवसपेक्षा आज किरणे चांगली होती. त्यांचा मार्ग योग्य होता. पण विविध अडचणींमुळे किरणे देवीपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे करंजकर यांनी सांगितले.