डॉ. किरवले खून प्रकरण

आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉ. प्रा. कृष्णा किरवले यांचा खून घर खरेदीच्या आíथक वादातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, मात्र यावर किरवले कुटुंबीयांनी आक्षेप नोंदवला आहे. पोलिसांचा तपास संशयास्पद असून, घर खरेदीचे कारण हा पोलिसांचा बनाव असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा सखोल आणि योग्य तपास होण्यासाठी जिल्ह्याबाहेरील पोलिस अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक नियुक्त करावे, त्याचबरोबर संशयितांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी डॉ. किरवले यांची कन्या अनघा किरवले यांनी पत्रकार परिषदेत केली. अनघा यांच्यासह आंबेडकरवादी पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.

डॉ. कृष्णा किरवले यांचा शुक्रवारी राहत्या घरात खून झाला होता. संशयित हल्लेखोरांनी आíथक वादाच्याच कारणाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, मात्र किरवले कुटुंबीयांसह आंबेडकरवादी पक्ष, संघटनांनी पोलिसांच्या तपासावर आक्षेप नोंदवला आहे. याबाबत अनघा किरवले म्हणाल्या,की आम्हाला घर विकण्याची गरज नव्हती. याबाबत घरात कधीच चर्चा झाली नाही. करारपत्रातील स्टॅप बाबांनी स्वत: खरेदी केलेला नाही. त्याची खरेदी आरोपी प्रीतमनेच केली आहे. करारपत्रातील वडिलांची सही खोटी आहे.

घराची किंमत एक कोटीच्या आसपास असतानाही केवळ  काही लाख रुपयांना व्यवहार कसा ठरेल? संचकार पत्राला प्रॉपर्टीची कागदपत्रे जोडलेली नाहीत. याशिवाय त्यात खाडाखोडही दिसते, त्यामुळे घर खरेदीचे कारण पुढे करून खुनामागील मूळ कारण दडपण्याची शंका बळावली आहे. पोलिसांच्या तपासावर आमचा विश्वास नाही. हा तपास जिल्ह्याबाहेरील पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपवावा, त्याचबरोबर संशयितांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या वेळी बोलताना प्रा. शहाजी कांबळे यांनीदेखील डॉ. किरवले यांच्या हत्येचा तपास सामाजिक संदर्भानी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. किरवले यांचे भाऊ कृष्णात किरवले आणि पुतणे डॉ. देवीदास किरवले यांनीही पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त करीत नव्याने तपास करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी किरवले कुटुंबीयांचे आरोप फेटाळले असून, त्यांच्या तक्रारींचे निरसन केले जाईल. तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी दिली.