महापालिकेत सत्ता प्राप्त केल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने सबका साथ सबका विकास अशी भूमिका घेत सर्वानाच सत्तेची फळे मिळवून देण्याचे धोरण स्वीकारले आहे.  सत्तारूढ गटाचे नेते आमदार सतेज पाटील यांनी महापालिकेत काग्रेसची सत्ता पाच वष्रे राहणार आहे. त्यामुळे जेवढे नगरसेवक आहेत, त्या सर्वाना कोणते ना कोणते पद हे दिले जाईल, अशी ग्वाही येथे दिली. विधान परिषद निवडणुकीत आमदार पाटील विजयी झाल्याबद्दल कॉग्रेस समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण प्रमुख उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवली.
आमदार झाल्यानंतर पाटील यांचा प्रदेश कॉंग्रेसतर्फे मुंबईत सत्कार झाला, परंतु शहर-जिल्हा कॉंग्रेसतर्फे झाला नव्हता. त्याचे आयोजन करण्यात आले. त्यास महापौर अश्विनी रामाणे, सर्व नगरसेवक व कार्यकत्रे उपस्थित होते.
या वेळी आमदार पाटील यांनी सर्व नगरसेवकांची बंद खोलीत व्यक्तिगत मते जाणून घेतली. कुणाला कोणत्या पदात रस आहे हे त्यांनी जाणून घेतले. कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पदाची व निधीचीही चिंता करू नये, असे सांगून त्यांनी जिल्हा नियोजन मंडळातून महापालिकेला भरघोस निधी मिळाला असल्याचे जाहीर केले. प्रास्ताविक ए. डी. गजगेश्वर यांनी केले. प्रदीप चव्हाण यांनी आभार मानले. या वेळी एस. के. माळी, उदय चव्हाण आदी उपस्थित होते.
कोल्हापुरात  कॉंग्रेस समिती कार्यालयात आमदार सतेज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महापौर अश्विनी रामाणे नगरसेवक व कार्यकत्रे उपस्थित होते.