कोल्हापुरात प्रदूषण रोखण्याच्या हालचाली

डॉल्बीमुक्तीबरोबरच आता कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून प्रदूषण रोखण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याकरिता काही मंडळांनी तयारी दर्शवली असून, ती प्रत्यक्षात उतरल्यास यंदाच्या गणेशोत्सवाला वेगळा आयाम लाभणार आहे. पंचगंगा नदी प्रदूषित होणार नाही याची यंदाच्या गणेशोत्सवात दक्षता घेत परंपरा जोपासून मूर्ती संकलन आणि पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन संकल्पना राबवण्यावर भर दिला जात आहे. मंगळवारी झालेल्या एका व्यापक बठकीत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची दिशा ठरवण्यात आली.

डॉल्बीचा दणदणाट आणि पंचगंगा नदी प्रदूषित होण्यास लागणारा हातभार, यामुळे गणेशोत्सवाला गालबोट लागत चालले आहे. त्यामुळे यंदा पोलिसांनी डॉल्बीमुक्ती तर जिल्हा प्रशासनाने  पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा गजर सुरू ठेवला आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवात मूर्ती विसर्जन संकल्पनेला जिल तील अनेक गणेश मंडळे आणि लोकांनी  सहकार्य केले होते. मंगळवारी  पर्यावरणपूरक गणेशोत्सव या विषयावर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पंचगंगा नदी प्रदूषणविषयक उपाययोजनेवर जिल्हा परिषदेच्या सभागृहात कार्यशाळेचे  आयोजन केले होते. या कार्यशाळेस १७४ गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच गटविकास अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, पोलीस उपअधीक्षक भरतकुमार राणे,  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गायकवाड उपस्थित होते.

यंदाच्या गणेशोत्सवात मूर्ती संकलन करून पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन संकल्पनेत लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी सर्वानी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करून कार्यशाळेचे उद्घाटक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, पाणी प्रदूषण रोखण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने घरापासूनच करावी. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीच्याही गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना सर्वच घटकांची विशेष नोंद घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.

पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड म्हणाले, पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनेत सर्वानी सक्रिय सहभाग दिला आहे. गावपातळीवरील यंत्रणांनी गणेशोत्सव काळात परस्पर समन्वय जोपासून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, यामध्ये गणेशमूर्तीचे संकलन तसेच निर्माल्य संकलन करून त्याची पर्यायी विसर्जन सुविधा निर्माण करावी आणि यासाठी गावागावांत प्रभावी जनजागृती आणि प्रबोधन व्हावे.