महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी सर्वसमावेशक अंदाजपत्रकाची आवश्यकता असते. महाराष्ट्राच्या आगामी अंदाजपत्रकात रस्ते आणि ऊर्जा क्षेत्राच्या विकासावर भर असेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. ज. फा. पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र अधिविभागात आयोजित केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावरील कार्यशाळेत ते बोलत होते. अर्थशास्त्र अधिविभाग, बँक ऑफ इंडिया आणि ‘समर्थन – सेंटर फॉर बजेट स्टडी’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आगामी अंदाजपत्रकाचे नियोजन करताना नागरिकांच्या मते, दृष्टिकोन वा धोरणांसंबंधीच्या सूचनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्याच्या निर्णयाचे प्रा.पाटील यांनी स्वागत केले. नागरिकांमध्ये असणारी आíथक जागरूकता व आíथक ज्ञान हे प्रभावी व सर्वसमावेशक अंदाजपत्रकासाठी अपेक्षित असल्याचे त्यांनी मत मांडले. डॉ. व्ही. बी. ककडे यांनी कार्यशाळा आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. या कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञ अर्थजाणकारांनी आपली मते वा अंदाजपत्रकाकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या.
नरेंद्र माने यांनी ‘कोल्हापूर उद्योग’ व ‘मेक इन महाराष्ट्र’ या विषयावर आपले मत मांडले. कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रामध्ये ऑटोमोबाइल इंडस्ट्री, कोल्हापूर एम.आय.डी.सी., सौरशक्ती, चर्मोद्योग, चांदी निर्मिती उद्योग, टेक्स्टाइल इंडस्ट्री, कृषी आदाने व गूळ निर्मितीउद्योग या सारख्या उद्योगांच्या विस्तारामुळे मेक इन महाराष्ट्राच्या उभारणीत कसा हातभार लागेल, याचे स्पष्टीकरण केले.
सिद्धिविनायक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पा रानडे यांनी ‘जेंडर बजेट’ विषयावर मार्गदर्शन केले. महिलांच्या सबलीकरणाबरोबरच त्यांच्या उभारणीसाठी ‘महिला व बालकल्याण विभागाची’ विभागणी करून महिला विकास विभागाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. ‘समर्थन सेंटर फॉर बजेट स्टडीज’चे संचालक प्रवीण महाजन, प्रा. डॉ. पी. एम.कांबळे, प्रा. डॉ. आर. जे. दांडगे, प्रा.बालाची सुरवसे यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तावना प्रा. डॉ. एम. एस. देशमुख यांनी मांडली. स्वागत प्रा. शशिकांत पंचगल्ले यांनी केले.