राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कोणताच निर्णय घेतला नाही. शासनाने तात्काळ कर्जमाफी करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने येथे  रविवारी आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. उपोषण करुन कर्जबाजारीपणास कंटाळून आपली जीवनयात्रा संपविलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.

यवतमाळ येथील साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्याने १९ मार्च १९८६ साली नापिकी व कर्जबारीपणाला कंटाळून परिवारासह जीवनयात्रा संपविली. या घटनेस रविवारी ३१ वष्रे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. पाटील यांच्या आत्महत्येची वेदनादायी जाणीव म्हणून रविवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आत्मक्लेष उपोषण करण्यात आले. यावेळी शासनाने त्वरित कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात युवक अध्यक्ष अमोल माने, माजी महापौर आर. के. पोवार, राजेश लाटकर, युवराज साळोखे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर माने, सुहास साळोखे, नागेश फराडे, एहसान शेख, फिरोज सरगूर, यांच्यासह कार्यकत्रे उपस्थित होते.

देशभरातील शेतकऱ्यांना  कर्जमाफी द्यावी- महाडिक

कोल्हापूर  : राज्यात कृषी कर्जमाफीसाठी विधानसभेचे कामकाज गाजत असताना हाच विषय गुरुवारी संसदेत उपस्थित करत खासदार धनंजय महाडिक यांनी देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि देशाच्या शेतीविषयक धोरणाचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी केली आहे.

देशभरातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, अशी मागणी करत खासदार महाडिक यांनी आज लोकसभेत देशाच्या शेतीविषयक धोरणाचा पुनर्वचिार व्हावा, अशी भूमिका मांडली. अन्नदाता शेतकरी आíथक अडचणीत आल्यानं आत्महत्या करतोय, ही शरमेची बाब असून, शेतकऱ्याला सबसिडी देण्याऐवजी शेतीमालाला हमीभाव आणि शंभर टक्के पीकविमा द्यावा, अशी मागणी केली. औद्योगीकरणाला ज्याप्रमाणे चालना दिली जात आहे, त्याच पद्धतीने कृषी क्षेत्राला सरकारने प्रोत्साहन द्यावे, असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि कृषी क्षेत्राच्या सबलीकरणासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या. संसदेत अभ्यासपूर्ण भाषण करून आज पुन्हा महाडिक यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला

नवी दिल्लीत सुरू असलेल्या लोकसभेच्या अधिवेशनात आज महाडिक यांनी, डिमांड्स अ‍ॅन्ड ग्रँट्स फॉर अ‍ॅग्रिकल्चर या विषयावरच्या चर्चासत्रात सहभाग घेतला आणि कृषी क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. गेल्या काही वर्षांत शेतकरी अडचणीत आला आहे. सुमारे १२ हजार ६०२ शेतकरी आणि शेतमजुरांची आत्महत्या होणे लाजिरवाणी बाब आहे.

शेतीमालाच्या किमान हमीभावासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, निर्यातीला चालना द्यावी, कृषिपूरक व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे. देशातील ६० टक्के जनता शेतीव्यवसायात असून, त्यांच्या श्रम, गुंतवणूक आणि उत्पादनवाढीसाठी ऑनलाइन सॉफ्टवेअर विकसित करावे, ज्यातून पेरणी, उत्पादन आणि विक्री यांची र्सवकष माहिती शेतकऱ्याला मिळेल, अशी मागणी त्यांनी संसदेत केली.