आम्ही सत्तेसाठी आलेलो नाही. तुमच्या सेवेसाठी आलो असल्याने केवळ विकासकामेच करू. आमच्याकडून कधीच बेईमानी केली जाणार  नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी, ग्रामीण जनतेला आश्वस्त केले. गारगोटी (ता. भुदरगड) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. शेतकऱ्यांना १२ तास वीज आणि शेती वीजपुरवठा करणारे फीडर सौरऊर्जेवर चालवण्याची घोषणा त्यांनी केली.

या मेळाव्यात काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र राहुल देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी यानिमित्ताने भाजपने केल्याचे स्पष्ट झाले. देसाई यांना िरगणात उतरवण्याचे संकेत देतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी देसाई यांच्या पाठीशी पक्षाची ताकद उभी करण्याचे आश्वासन दिले. आजची उपस्थिती पाहता आगामी आमदार कोण हे दिसून आले आहे, असे विधान त्यांनी करताच देसाई समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या. हे राजकीय विधान वगळता फडणवीस यांनी राजकीय शेरेबाजी करण्याचे टाळले. तसेच, सभेवेळी स्थानिक प्रश्नांची मांडणी करूनही त्यांनी ती बेदखल केली.  दहा मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी मेळाव्याचा संदर्भ देत शासन शेतकरी हितासाठी करत असलेल्या कामांचा उल्लेख केला. ते म्हणाले, शेती समृद्ध व्हावी आणि शेतकरी संपन्न व्हावा यासाठी शासनाने २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

चंद्रकांत पाटील भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणाबाजी

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील भाषण करण्यासाठी उभे राहताच भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री व्यासपीठावर असतानाच जनतेची घोषणाबाजी झाल्याने त्याची चांगलीच चर्चा झाली. या वेळी मंत्री पाटील यांनी आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या २०० जागा येतील आणि तेव्हा बहुमताने सरकार स्थापन करू, असा दावा केला. सत्तेत राहून सरकार विरोधात पवित्रा घेणाऱ्या शिवसेनेवर चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला.