ऑल इंडिया ज्वेलर्स अॅक्शन कमिटीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या तीन दिवस बंदला पाठिंबा असल्याचा ठराव कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या बैठकीत रविवारी करण्यात आला असला तरी गेले तीन दिवस शहरातील बहुतांशी सराफी दुकाने उघडी होती. यामुळे बंदचे आवाहन केवळ कागदावर उरून बंद फसल्यात जमा झाला.
केंद्रीय अबकारी कराला विरोध करण्यासाठी दोन मार्चपासून सराफी दुकाने बंद ठेवून सराफ व्यावसायिकांनी केंद्र शासनाचा विविध आंदोलनाच्या माध्यमातून निषेध केला. त्यातून बैठका होऊन गेल्या १२ एप्रिलला सराफी दुकाने पुन्हा सुरू झाली. या वेळी शिखर संघटना ऑल इंडिया ज्वेलर्स अॅक्शन कमिटीने सरकाराला या जाचक कायद्यात सुधारणा करण्यासाठी २४ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. जरूर ती सुधारणा झाली नाही तर पुन्हा २५ पासून दुकाने बंद करण्याचे ठरले. शिखर संघटनेने २५, २६ व २७ तारखेला दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारी कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाची बैठक झाली. देशव्यापी सराफ बंदला पाठिंबा देण्याचा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. बंदमध्ये सराफ व्यवसायाशी संबंधित संघटनाही संलग्न असल्याचे सांगण्यात आले.
तथापि या बंदच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. बैठकीस उपस्थित असलेल्या पदाधिका-यांनीही बंदमध्ये सहभाग नोंदवला नाही. सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष भारत ओसवाल यांच्यासह इतरांची सराफी दुकान उघडी राहिल्याने त्याची चर्चा होती.