हातकणंगले-कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील नागरिका एक्स्पोर्ट  लि. या वस्त्र उत्पादन करणाऱ्या कंपनीस रविवारी सकाळी भीषण आग लागली. सुमारे पाच तासाच्या अथक परिश्रमानंतर आग नियंत्रणात आली. या घटनेत सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये एक कामगार जखमी झाला. या कंपनीमध्ये ४ ते ११ मार्च या कालावधीमध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले असून नेमक्या याच कालावधीत ही दुर्घटना घडल्याने त्याची चर्चा आहे.

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत असलेल्या नागरिका एक्स्पोर्ट कंपनी वस्त्र उत्पादन घेतले जाते. कंपनीच्या एकाच छताखाली असलेल्या मोठय़ा इमारतीमध्ये पार्टिशन करून वेगवेगळे विभाग उभारण्यात आले आहेत. त्याच्या एका बाजूला गोदाम आहे. त्यामध्ये कापूस व उत्पादित सूत याचा साठा केला जातो. या गोदामात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. कापूस व सूत हे ज्वलनशील घटक असल्याने आगीने रौद्ररुप धारणे केले होते. कंपनीमध्ये या वेळी ९२ कर्मचारी काम करत होते. त्यांनी आग नियंत्रण आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले.  कागल नगरपालिका, औद्योगिक वसाहत, कोल्हापूर महापालिका, जवाहर साखर कारखाना येथील चार अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून ५ तासानंतर आग आटोक्यात आणली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी गोदामाचे पत्रे क्रेनच्या सहायाने फोडले.

या आगीमध्ये सूत, कापूस, फíनचर, कागदपत्रे यांचे मोठे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश कांबळे व सहकाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी केली.