इचलकरंजी परिसरात धुमाकूळ घालणा-या चौघा चोरटय़ांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी गजाआड केले. प्रमोद संजय जाधव, विनायक विजय कुंभार, उमेश सिकंदर राठोड आणि स्वप्निल धोंडिराम बिरंगे अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ मोटरसायकली तसंच ४० मोबाइल संच असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
इचलकरंजी शहरात चोऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर गस्त घालत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने इचलकरंजी ते तारदाळ जाणाऱ्या मार्गावर संशयावरून प्रमोद जाधव यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी करता त्याने आदर्श झोपडपट्टी आणि पंचगंगा नदी काठावरील महादेव मंदिर इथून दोन मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ८० हजार रुपयांच्या दोन्ही मोटरसायकली जप्त केल्या आहेत. दरम्यान, चोरीचे मोबाइल विक्रीसाठी आलेल्या विनायक कुंभार, उमेश राठोड आणि स्वप्निल बिरंगे या तिघांना थोरात चौकातील भगतसिंग उद्याननजीक पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडील मोटरसायकल चोरीची असल्याचंही निष्पन्न झाले आहे. तिघांनीही बंडगर माळ येथील गुणी टेलिकॉम ही मोबाइल शॉपी दोन महिन्यांपूर्वी फोडल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख १० रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे सुमारे ४० मोबाइल जप्त केले. या चोरटय़ांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस उपनिरीक्षक विजय सूर्यवंशी यांनी वर्तवली आहे.