कोणताही देश महासत्ता होण्यासाठी देशाच्या व्यवस्थेचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. कारण या व्यवस्थेचे आपण घटक असतो. या बाबत आपण आत्ता सुरुवात केली तर तिसरी पिढी महासत्ता होऊ शकेल, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी येथे केले. इचलकरंजी येथील ४१व्या मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत त्यांनी ‘देश महासत्ता म्हणजे काय?’ या विषयावर आपले विचार मांडले.

देश महासत्ता व्हावा ही अपेक्षा सारेच करतात, पण त्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे याचे विवेचन कुबेर यांनी त्यांच्या या व्याख्यानात केले. त्यासाठी त्यांनी जगाच्या तुलनेत आपला देश कोठे आहे याची तपशीलवार आकडेवारी सादर केली. चांगले रस्ते, शिक्षणाचा उच्च दर्जा, उत्तम आरोग्य, दळणवळणाची व्यवस्था आणि मोकळेपणाचं वातावरण या पाच बाबी कोणत्याही देशाला महासत्ता बनवण्यास पोषक असतात, असे सांगून ते म्हणाले, की या घटकातील आपले स्थान खूप खाली आहे. प्रगत देशांच्या तुलनेत यावरील आपला खर्चही फारच कमी आहे. १९९८ साली पोखरण-२ च्या अणुचाचण्या झाल्या. त्या वर्षी भारताने महासत्ता होण्याचं पहिलं स्वप्न पाहिलं. पण बॉम्ब, रणगाडे, लष्कर आहे म्हणून कोणताही देश महासत्ता होत नाही. तर कल्पनाशक्तीला वाव देणारी, विचारांची मुक्त व्यवस्था ज्या देशात असते तो देश महासत्ता बनतो.

व्यवस्थेच्या सबलीकरणाची जोवर नागरिक मागणी करत नाहीत तोपर्यंत त्यात काहीही सकारात्मक बदल होणार नाहीत असे सांगत ते म्हणाले, की भारतामध्ये शिक्षणासाठी अर्थसंकल्पामध्ये अवघी ३.७५ टक्के एवढीच रक्कम राखून ठेवण्यात आली आहे. देशातल्या नागरिकाला दरडोई किती ऊर्जा वापरायला मिळते यावरून तो देश किती मोठा आहे हे मोजले   जाते. आपले हे प्रमाणही खूप कमी आहे.

ज्यांना भविष्यकाळातील वेध घेता येतो अशा लोकांच्या हातात देश असतो तेव्हा देश महासत्ता बनतो. अमेरिकेत २००१ साली सत्ताधाऱ्यांनी खनिज तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा निर्णय घेतला होता. २०१८ साली ही उद्दिष्टपूर्ती करायची होती. या दरम्यान, देशात सत्तांतरे झाली तरी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे थांबले नाही. २०१६ सालीच हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. अशी वृत्ती अमेरिका हा देश महासत्ता होण्यात महत्त्वाचा मुद्दा आहे.

देश महासत्ता होण्यासाठी उत्तम आरोग्यव्यवस्था आवश्यक आहे, पण आपल्याकडील ३५ टक्के लोक अजूनही उघडय़ावर शौचाला जातात, मग आपण महासत्ता बनण्याच्या कोणत्या दिशेने जात आहोत, असा प्रश्न उपस्थित करून कुबेर म्हणाले, की अर्थकारण समजून घेतलं नाही तर कोणत्याच देशाची प्रगती होणार नाही. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनही अंगात भिनणे अत्यावश्यक आहे.

व्याख्यानानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना कुबेर यांनी सविस्तर उत्तरे दिली. श्री. दगडूलाल मर्दा फाऊंडेशनचे श्यामसुंदर मर्दा यांनी स्वागत केले. मनोरंजन मंडळचे अध्यक्ष आनंद गजरे आणि रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष हिराचंद बरगाले मंचावर उपस्थित होते. संतोष आभाळे यांनी प्रास्ताविक केले, तर संजय होगाडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रा. समीर गोवंडे यांनी आभार मानले.