कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा  खोवला गेला असून राज्यातील या सर्वात मोठय़ा दूध संस्थेला देशपातळीवरील ‘एक्सलन्स अ‍ॅवार्ड’ने सन्मानित करण्यात आले .

राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ ( एन.डी.डी.बी.) आनंद, गुजरात यांच्यातर्फे दिला जाणारा देशपातळीवरील डेअरी उत्कृष्टता पुरस्कार (एक्सलन्स अ‍ॅवार्ड) गोकुळला केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांच्या हस्ते व गुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रूपानी यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. तीन लाख रुपये, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार गोकुळच्या वतीने अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्वीकारला. यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर उपस्थित होते. गोकुळने महिला सबलीकरण या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार देऊन गोकुळ्ला सन्मानित करण्यात आलेले आहे.

गोकुळने २३०० महिला बचत गट स्थापन करून २५ हजार महिलांनी या बचत गटांचे सभासदत्व स्वीकारले आहे. साडेपाच कोटी रुपयांच्या ठेवी असणारे हे महिला बचत गट आíथकदृष्टय़ा सबल आहेत. गोकुळच्या संलग्न प्राथमिक दूध संस्थांच्या महिला सभासदांची संख्या अंदाजे दोन लाख असून दुग्ध व्यवसायात महिलांचा सहभाग जास्तीत जास्त असून या व्यवसायातील ८० टक्के कामे महिलाच करतात. आजपर्यंत पाच हजार पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे महिला प्रशिक्षणाचे वर्ग गोकुळने आपल्या कार्यक्षेत्रात आयोजित केलेले आहेत.

दर दहा दिवसांचे दुधाचे बिल महिला दूध उत्पादकांच्या हातात देण्याची योजना गोकुळने सर्वप्रथम प्रभावीपणे राबविली आहे. गोकुळकडे सध्या ८३८ महिला दूध संस्था दूध पुरवठा करत आहेत. गोकुळने केलेल्या आपल्या कार्यक्षेत्रातील या कामाची नोंद घेऊन एन.डी.डी.बी.ने  महिला सबलीकरणाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल एक्सलन्स अ‍ॅवार्ड देऊन सन्मानित केले आहे.