ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता हाती असलेल्या पुराव्यांच्या आधारे मारेकरी व त्यामागील सूत्रधारांवर कडक कारवाई करावी. यातील सूत्रधारांना जनतेसमोर आणावे, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या जन्मदिनानिमित्त दसरा चौक येथे आज (मंगळवार) ‘सामाजिक अत्याचार प्रतिबंध चळवळ व जाती मुक्त आंदोलन‘च्या वतीने आयोजित निर्धार परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या वेळी अ‍ॅड. आंबेडकर यांनी सरकारने राजकीय दबाव आणून तपासात अडथळा आणल्यास तुमचे पितळ उघडे पाडू, असा इशाराही त्यांनी या दरम्यान दिला. देशातील राजकीय परिस्थिती बदलत असताना, आता सर्वच पातळ्यांवर बदल होत आहे. सध्या देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. देशात धार्मिक दहशतवाद पसरला जाऊ शकतो. पानसरेंच्या संशयित मारेकऱ्याला पोलिसांनी पकडले आहे. आता न थांबता त्याच्या मागील ‘ब्रेन’ शोधावा, त्यांना जनतेसमोर आणावे. देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता देशात पुन्हा निवडणूक झाली तर सत्तेतील सरकारची सत्ता जाईल. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोिवद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या करून पक्षीय दहशतवाद निर्माण करण्याचाही प्रयत्न होत आहे. यामुळे देशाची सामाजिक व्यव्यस्था दुबळी करण्याचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहेत.
ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, देशाचा इतिहास विकृत करणाऱ्या शक्तींविरोधात आवाज उठविणारे पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या. पानसरे यांच्या जन्मदिनी कोणताही समारंभ न करता त्यांचा संघर्ष आणि बलिदान लक्षात ठेवून त्यांच्या विचाराची लढाई यापुढेही चालू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.