कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने जी. पी. एस. कार्यप्रणालीद्वारे (ग्लोबल पोजिशिनग सिस्टीम) सर्व मिळकतींच्या सव्‍‌र्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत  विविध ८० मुद्दय़ांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. या कामाची आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी दसरा चौक येथे भेट देऊन तेथील सारस्वत भवन, के. डी. कामत सभागृह, स्टेट बँक, सारस्वत गौड ब्राम्हण विद्यार्थी वसतीगृह या मिळकतींच्या सव्‍‌र्हेक्षणाची पाहणी केली. आयुक्तांनी सव्‍‌र्हेक्षणाबाबत अधिक माहिती संकलित करण्याच्या सूचना संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

हे सव्‍‌र्हेक्षण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे प्रकरण ८ कराधान नियममधील तरतुदीनुसार करण्यात येणार आहे. या सव्‍‌र्हेक्षणाचे काम सायबरटेक सिस्टीम सॉफ्टवेअर लि. या संस्थेमार्फत करण्यात येत आहे. या सव्‍‌र्हेक्षणात शहरातील मालमत्ताधारक, भोगवटाधारक, कूळ यांच्या नावांची, पत्यांची, पिनकोड, बांधकाम तारीख, मिळकत व्यवसाय परवाना, वीज ग्राहक क्रमांक, वीज मीटर क्रमांक, पाणी ग्राहक क्रमांक इ. माहिती, मिळकतीची माहिती, मालमत्तेचे क्षेत्रफळ, बांधकामाचा प्रकार व वापर, इमारतीचा फोटो, सर्व खोल्यांचे मोजमाज, भाडे करारपत्र, भोगवटादार कूळ व्यक्तींची माहिती, बांधकाम, भोगवटा प्रमाणपत्र, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, कुटुंब संख्या इत्यादी विविध ८० मुद्दय़ांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. मिळकतधारक व रहिवासी, भोगवटदार, कूळ रहिवास नागरिकांनी मिळकतीची सर्व माहिती सव्‍‌र्हेक्षणासाठी आलेल्या प्रतिनिधीस देऊन ती तपासून ती योग्य असल्याची खात्री करून त्यासंबंधीची कागदपत्रे संबंधित सव्‍‌र्हे करणाऱ्या व्यक्तीस द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. यावेळी कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, अधीक्षक प्रशांत पंडित, ‘सायबरटेक’चे जयंत पंत, प्रशांत सिंग कर्मचारी उपस्थित होते.