रिझर्व्ह बँकेने कारवाई केलेले संचालक मंडळ सत्तेवर आल्यास त्यांच्या ठेवीदारांच्या ठेवीवर परिणाम होईल हा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेवर संचालक म्हणून काम करताना चुकीचा ठरवला आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या एक वर्षाच्या काळात जिल्हा बँकेच्या ४०० कोटी रुपयांच्या ठेवीची वाढ झाली आहे. असे असतानाही सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूड भावनेने जिल्हा बँकेकडे पाहू नये, असे मत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. दौलत साखर कारखान्याच्या थकबाकीसाठी कुमुदा शुगर्सला कारखाना भाडय़ाने देण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीला कराराप्रमाणे रक्कम भरण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत असून या काळात रक्कम न भरल्यास संचालक मंडळ वेगळा निर्णय घेईल, असे म्हणत मुश्रीफ यांनी दौलत कारखान्याची विक्री हा अखेरचा पर्याय असल्याचे संकेत दिले.
सहकार मंत्र्यांनी राज्यातील सहकारी संस्थेत चुकीचे काम करणाऱ्या संचालकांना १० वष्रे कोणत्याही संस्थेत संचालक पदावर काम करता येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी रिझव्र्ह बँकेने कारवाई केलेल्या संचालकांच्या विरोधात पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेना-भाजपमधील दिग्गज नेत्यांवर या कारवाईचा फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेतील अध्यक्ष, उपाध्यक्षांसह ११ संचालकांना या कारवाईला सामोरे जावे लागत असून संचालक मंडळ बरखास्तीच्या मार्गावर आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, जिल्हा बँकेच्या ठेवीमध्ये पावणे चारशे कोटी, कर्जवाटपात १६० कोटी वाढ झाली आहे. सामोपचार योजनेमुळे ५४ पकी २० संस्थांनी पसे भरले असून एनपीएचे प्रमाण ५ टक्क्यापर्यंत खाली आले आहे. अशा स्थितीत सहकारमंत्र्यांनी सूडभावनेने कारवाई सुरू केल्याने ठेवींवर परिणाम झाल्यास त्यास मंत्रीच जबाबदार राहतील. रिझर्व बँकेबाबतचा कायदा १० वष्रे जुना आहे. तो पूर्वलक्ष्यी प्रभावाने राबवता येणार नाही. तांत्रिक कारणावरून जबाबदार धरून कारवाई करणे अयोग्य आहे. सहकार मंत्र्यांनी याबाबतचा अभ्यास केलेला नाही, असा टोला त्यांनी लगावला. सावंतवाडी येथील कार्यक्रमावेळी सहकारमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना हातात तलवारी घेण्याचे आवाहन केले आहे. याकडे लक्ष वेधून मुश्रीफ म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते आहे. त्यांना अयोग्य काही वाटल्यास पोलिसांमार्फत कारवाई करू शकतात. पण हाती तलवार घेण्याची भाषा ही सहकारमंत्र्यांची मनोवृत्ती दर्शविणारी आहे. ती पाहता सहकार मंत्री आम्हा सहकारातील कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला मारल्याशिवाय राहणार नाहीत, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
कुमुदा शुगर्सच्या व्यवहाराबद्दल मुश्रीफ म्हणाले, दौलत साखर कारखान्याची थकबाकी अधिक असल्याने तो भाडेतत्त्वावर देण्यासाठी ६ वेळा निविदा काढण्यात आली. पण प्रतिसाद मिळाला नाही. कुमुदा शुगर्स या एकमेव कंपनीने दौलत घेण्याची तयारी दाखवली. १ कोटी रुपये भरून करार केला. आता १० कोटी अनामत व १५ कोटीची बँक गॅरंटी देण्याचीही तयारी दाखवली आहे. आता या कंपनीचे अध्यक्ष अविनाश भोसले व उपाध्यक्षांवर फौजदारी दाखल आहे. भोसले यांनी आपल्यावरील कारवाई हा कट कारस्थानाचा भाग असल्याचे मला सांगितले आहे. एखादी व्यक्ती सुडाने पेटली की काय करते याचे हे उदाहरण असल्याचा आरोप सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर करताना मुश्रीफ यांनी राग आमच्यावर काढा, पण बँकेचे नुकसान केले तर शेतकरी अडचणीत येतील, असा इशारा दिला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक के. पी. पाटील, अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, संचालक सर्जेराव पाटील, बाबासाहेब पाटील असुल्रेकर, विलास गाताडे, भय्या माने आदी उपस्थित होते.