वरिष्ठ पातळीवर विधान परिषदेसाठी काँग्रेसबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला असून कोल्हापूर जिल्ह्यातील ही जागा काँग्रेसकडेच असल्याने काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच राष्ट्रवादीच्या सर्व मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडून पक्षाशी बेईमानी करू नये असे बजावले आहे.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या जागेसाठी डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीची काय भूमिका असेल या संदर्भात जिल्ह्यातील नऊ नगरपालिका, एक महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती अशा राष्ट्रवादी पक्षाच्या मतदारांची संयुक्त बठक जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात माजी खासदार निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्वागत जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.
आमदार मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील ७ पैकी ४ जागा काँग्रेसला तर ३ जागा राष्ट्रवादीला आहेत. पक्षाचे नेते शरद पवार यांनी ही निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे आहे. काँग्रेस पक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील ११८ सदस्यांनी पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवारालाच मतदान करावे. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर ताराराणी कडून महापौर-उपमहापौरांसह सर्व पदे व सत्ता देण्याचा प्रस्ताव आला होता, पण आम्ही पूर्वीच काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असल्याने विश्वासार्हता व सत्तेचा मोह सोडला. सत्तेसाठी राष्ट्रवादी काही करू शकते असा संदेश जाऊ नये व काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला सुरुंग लागू नये म्हणूनच ताराराणीला नकार दिला.
यानंतर आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी प्रत्येक नगरपालिका, महापालिका, जि. प. सदस्य यांच्या राष्ट्रवादी सदस्यांच्या गटाशी स्वतंत्रपणे बंद खोलीत चर्चा केली. बठकीला माजी आमदार अशोक जांभळे, राजेंद्र पाटील यड्रावकर, उपमहापौर शमा मुल्ला, आर. के. पोवार आदी उपस्थित होते.
दोन्हीकडून काही घेऊ नका
विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानासाठी काय चालते हे उघड आहे, पण राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पक्षाशी निष्ठा राखत उमेदवार दोन असले तरी दोन्हीकडून कोणीही काही घेऊ नका असा सल्ला मुश्रीफ यांनी खासगीत सर्वाना दिला आहे.